मुंबई : मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. पहिलाच दिवस गाजला तो उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या लिफ्ट भेटीने. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. दोघेही मिळून वरच्या मजल्यावर गेले. ही गोष्ट ठरवून झाली की योगायोगाने यावरून राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चांना एकच उधाण आले.
‘त्यांची’ लिफ्ट सहाव्या मजल्यावर पोहोचू शकणार नाही - मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यावर म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मंत्रालयातील दालन ज्या मजल्यावर आहे, तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. दोन वर्षांपूर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये ‘शिफ्ट’ झाल्याने आम्ही जनतेच्या ‘लिफ्ट’मध्ये आल्याचा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लिफ्टचा विषय गाजला. विधानभवनाच्या लिफ्टमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले. उद्धव ठाकरे हे विधानभवनाच्या वरील मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टजवळ उभे होते. त्याचवेळी तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले, तेव्हा दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नमस्कार केला. दोघे तिथे एकमेकांशी बोलले, त्यानंतर दोन्ही नेते लिफ्टमध्ये शिरले. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचे सांगितले जाते. या लिफ्ट भेटीने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. राज्यात गेल्या काही वर्षांत ज्या वेगवान राजकीय घडामोडी घडल्या, त्यानंतर तसेच आताच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर या दोन्ही नेत्यांच्या भेटीबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र मागच्या काही कालावधीत सोडले होते. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात येत आहे.
लिफ्टला कान नसल्याने पुढील गुप्त चर्चा तेथेच करू - उद्धव
लिफ्टमध्ये दोघेही एकमेकांशी सौहार्दाने बोलताना दिसून आल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’चा अंक भविष्यात रंगणार, असे अनेकांना वाटले. पण ती योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती. लिफ्टच्या भिंतींना कान नसतात. त्यामुळे पुढील गुप्त चर्चा लिफ्टमध्येच करू, असे उद्धव ठाकरे या भेटीबद्दल मिश्कीलपणे म्हणाले.
लिफ्टनंतर चंद्रकांतदादांचे ‘कुछ मिठा हो जाए’
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच अनिल परब यांची विधानभवनातच भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे, परब आणि दानवे यांना चॉकलेट दिले. चंद्रकांत पाटील स्वत:हून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्याने आणि चॉकलेट दिल्याने पहिल्या दिवशी तो देखील खमंग चर्चेचा विषय ठरला.