अब की बार, भाजप तडीपार! उद्धव ठाकरे यांचा घणाघात

‘अब की बार ते ४०० पार’ असे ते सांगताहेत, पण मी तर म्हणतो की, ‘अब की बार भाजप तडीपार’ करूया. तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा कसे जिंकता तेच मी पाहतो...
अब की बार, भाजप तडीपार! उद्धव ठाकरे यांचा घणाघात
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीने ४२ खासदार निवडून दिले नसते, तर भाजपला दिल्लीचे तख्त राखता आले नसते. आता दिल्लीचे तख्त पहिल्यांदा फोडावे लागेल आणि तिथे आपले तख्त बसवावे लागेल. ‘अब की बार ते ४०० पार’ असे ते सांगताहेत, पण मी तर म्हणतो की, ‘अब की बार भाजप तडीपार’ करूया. तुम्ही ४०० पेक्षा अधिक जागा कसे जिंकता तेच मी पाहतो, असे थेट आव्हान शिवसेनेचे (उबाठा) नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले.

विरोधी पक्षांच्या तोडफोडीचे राजकारण यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी रविवारी धारावीतील सभेत दिला. भाजपने आमचा विश्वासघात केला. गेल्या वेळेला महाराष्ट्राने ४० ते ४२ खासदार निवडून दिले नसते तर भाजपला २५० पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नसत्या. भाजपने दोन वेळा आमचा विश्वासघात केला, असे ते म्हणाले.

आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमच्यासोबत होतो. आमचे हिंदुत्व आणि तुमचे हिंदुत्व वेगळे आहे. तुमचे हिंदुत्व आम्ही मान्य करायला तयार नाही. आज माझ्यासोबत समाजवादी लोक आहेत, मुस्लीम समाजातील लोक आहेत, कारण आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटवणारे हिंदुत्व आहे. तर भाजपचे हिंदुत्व हे घरातली चूल विझवणारे हिंदुत्त्व असल्याचे ते म्हणाले. आमचे हिंदुत्व हे गाडगेबाबांचे हिंदुत्व आहे. ते तहानलेल्या पाणी देणारे, घर नसणाऱ्यांना घर देणारे, असे आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मोदींनी ‘जुमला’चे नाव ‘गॅरंटी’ केले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ शहरे, रेल्वे स्टेशन आणि योजनांची नावे बदलायचे काम केले आहे. योजनांची केवळ नावे ते बदलत आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी काहीही केले नाही. मात्र, आता त्यांनी ‘जुमला’चे नावे देखील बदलले असून जुमलाचे नाव ‘गॅरंटी’ केले असल्याचे ते म्हणाले. नेत्यांवर केवळ आरोप करायचे आणि आरोप करून त्यांना भाजपमध्ये घ्यायचे. भाजपमध्ये आल्यानंतर तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली.

‘माज’वादी विरुद्ध ‘समाजवादी’

आगामी लोकसभा निवडणुकीतील लढाई ‘माज’वादी विरुद्ध ‘समाजवादी’ अशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धारावीमध्ये आयोजित संयुक्त समाजवादी संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव हवे होते, मात्र, ज्या व्यक्तीवर तुम्ही कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला, त्या व्यक्तीला या यादीत स्थान दिले, असे म्हणत त्यांनी कृपाशंकर सिंह यांना दिलेल्या उमेदवारीवरून भाजपवर टीकास्त्र सोडले.

“देशात भाजप विरोधात वातावरण आहे. जनतेच्या मनात असंतोष आहे. पण हे जर ईव्हीएमचा घोटाळा करून परत एकदा जिंकून आले तर जनतेत मोठा असंतोष निर्माण होईल. आपल्याला याचीच चिंता वाटते,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मावळ मतदारसंघात जनसंवाद दौरा

लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने उद्धव ठाकरेंनी दौरे सुरू केले आहेत. सोमवारी ते मावळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी तीन वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. चार वाजता पनवेल येथे तर साडेपाच वाजता खोपोली येथे सभा घेणार आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता उरण येथे त्यांची सभा होईल. सध्याचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या मतदारसंघात आपली ताकद लावणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in