
रत्नागिरीतील राजापूर येथील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. आंदोलकांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. नारायण राणे यांनी दिलेल्या आव्हानावरही त्यांनी भाष्य केले.
"लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणची जनता भिकारी झाली तरी चालेल. मात्र, रिफायनरी बांधलीच पाहिजे, अशी शिंदे सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूच्या जनतेला रिफायनरी नको आहे. हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर केली आहे.
मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आले आणि आता महाराष्ट्रावर वादग्रस्त प्रकल्प राबवले जात आहेत. हे सरकार आपल्याच लोकांचे नुकसान करून विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको आहे, असे ते म्हणाले.