
महाराष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती केली होती; मात्र त्यांनी चालिसा पठणाकडे पाठ फिरवली. आज त्यांच्याकडे सतरंजी उचलायला कार्यकर्ता उरला नाही, अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी रात्री येथे बोलतांना केली.
बालाजी पेठेतील महाराणा प्रताप मित्र मंडळातर्फे सोमवारी रात्री हनुमान चालिसा पठणाचा सामुहिक कार्यक्रम झाला. यावेळी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा दाम्पत्य उपस्थित होते. गणेशाची महाआरती झाल्यानंतर एक हजार स्त्री पुरूषांसमवेत राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण केले. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘आम्ही मोदी भक्त आहोत, याचा आम्हाला गर्व आहे. महाराष्ट्रावरील संकट दूर होण्यासाठी उध्दव ठाकरेंना हनुमान चालिसा पठण करण्याची विनंती केली होती; पण त्यांनी पठण केले नाही. उलट आम्हालाच तुरूंगात टाकले. सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना गरिबाच्या व्यथा काय कळणार, असा टोला लगावत या देशात रामभक्त होणे, हनुमान चालिसा वाचणे, हा गुन्हा आहे काय, असा सवाल उपस्थितांना केला. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी महिलांचा नेहमीच सन्मान केल्याचे सांगत उध्दव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहिल्याने खऱ्या हिंदुत्वाचे विचार विसरून गेले.