मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलंय, मी त्यांना धन्यवाद देतो, पण...; उद्धव ठाकरे म्हणाले...

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करुन १० टक्के आरक्षणाची तरतुदही केली. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Eknath Shinde And Uddhav Thackeray
Eknath Shinde And Uddhav Thackeray

मुंबई : राज्य सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाचं विधेयक एकमताने मंजूर करुन १० टक्के आरक्षणाची तरतुद केली. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. कुठल्याही समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलंय, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. पण पूर्ण खात्रीशीर माहितीशिवाय या सरकारवर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे, ज्या ज्या वेळी मराठा समाजाचा विषय आमच्यासमोर आला, त्यावेळी सभागृहात सर्व पक्षांनी एकमताने हा ठराव मंजूर केला आहे. २०१८ ला असाच ठराव होता आणि आजही होता. त्यामुळे सभागृहात कुणालाही समजून सांगण्याची गरज नव्हती, असं म्हणत ठाकरे यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.

ठाकरे पुढे म्हणाले, मराठा समाजालाही मी धन्यवाद देतो. कारण त्यांनीही खूप लढा दिलेला आहे. सरकारला मला इतकच सांगायचं की, तुम्ही हा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तुमच्याबद्दल मी काही शंका घेत नाही. पण त्यासाठी मराठा समाजातल्या अनेकांना बलिदान द्यावं लागलं. मी जालनाला जाऊन अंतरवाली सराटीत गेलो होतो. ज्या निर्घृणपणाने आणि निर्दयीपणाने आंदोलकांवर अत्याचार केला होता, डोकं फोडलं होतं, ते फोडण्याची काही गरज नव्हती.

हा विषय पहिल्यापासून शांततेत सोडवता आला असता. मला राजकारणाबद्दल खूप काही बोलायचं नाहीय. पण कुठल्याही समाज्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलंय, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि एकच प्रार्थना करतो. पूर्वीचे सर्व अनुभव लक्षात घेऊन हे आरक्षण कायद्याच्या सर्व निकषांना आणि पातळींवर टिकून राहिल आणि टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल, अशी आशा बाळगतो.

हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिलं आहे. जेव्हा शैक्षणिक वर्ष सुरु होईल, तेव्हा आपल्या सर्वांना याबाबत कळेलच. मराठा समाजातील किती जणांना नोकऱ्या कुठे मिळणार, हे सुद्धा सरकारने जाहीर केलं तर सोन्याहून पिवळं होईल. या आरक्षणाबाबत दोन मतप्रवाह असते तर आम्ही सभागृहात एकमताने मंजूरच केलं नसतं. गेल्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता. पण नंतर लक्षात आलं की, फसवणूक झाली. त्याप्रमाणे आत्तासुद्धा सरकारने जी हमी घेतली आहे, ती हमी निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे. निवडणूक काढून घेण्याचा त्यांचा काही डाव नसेल ना, असा प्रश्न मला उपस्थित करायचा नाही. कारण मला राजकारण आणायचं नाही. पण पूर्ण खात्रीशीर पटल्याशिवाय या सरकारवर विश्वास ठेवणं जरा कठिण आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in