उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात! प्रताप सरनाईक यांचे सूचक विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेही एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेही एकत्र येऊ शकतात! प्रताप सरनाईक यांचे सूचक विधान
Published on

धाराशिव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. त्यापाठोपाठ आता परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हेही एकत्र येऊ शकतात, असे सूचक विधान केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राजकीय क्षेत्रात आज जे चित्र दिसते तेच उद्या असेल असे नाही, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जवळपास दोन दशकांनंतर एकत्र आल्याचे चित्र दिसले. यदाकदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो, पण त्यासाठी वाट पाहावी लागेल, असे सूचक विधान सरनाईक यांनी केले.

प्रताप सरनाईक हे धाराशिवच्या दौऱ्यावर असताना त्यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना हे विधान केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात शनिवारी झालेल्या एका आकस्मिक भेटीबद्दल प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला होता. आमच्या भेटीच्या बातम्या बघून काही नेते गावाला निघून जातील, असे विधान आदित्य ठाकरे यांनी केले होते.

आदित्य ठाकरेंच्या विधानावर सरनाईक म्हणाले, सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. कालपरवा विधिमंडळात भाषण करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचे आवाहन केले होते. ‘२०२९ पर्यंत आम्ही तरी विरोधात येऊ शकत नाही, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही या बाजूला (सत्ताधारी बाकावर) येऊ शकता, असे म्हटले होते, याची आठवण प्रताप सरनाईक यांनी करून दिली.

...त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल!

विधिमंडळात शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसायला नकार दिला होता. तसेच हे दोन नेते एकमेकांना नमस्कारही करत नाहीत, असा प्रश्न विचारला असता प्रताप सरनाईक म्हणाले की, आज जे चित्र दिसते, तेच उद्या असेल असे नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास दोन दशकांपूर्वी वेगळे झाल्यानंतर तेही एकमेकांकडे पाहत नव्हते, हसत नव्हते. आता ५ जुलै रोजी मात्र त्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. यदाकदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीतही होऊ शकतो. पण त्यासाठी वाट पाहावी लागेल.

logo
marathi.freepressjournal.in