आघाडी सर्व जागा जिंकेल! उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘मशाल’ या अधिकृत चिन्हाच्या व नव्या गीताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले.
आघाडी सर्व जागा जिंकेल! उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : महाविकास आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व ४८ जागा जिंकणार, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजपचा ४५ प्लसचा आकडा हा संपूर्ण देशाचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेले चालत नाही. ते विरोधी पक्षांना भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी इकडे-तिकडे फिरत आहेत. जिथे कुठे भ्रष्टाचारी दिसला की मोदींचा व्हॅक्यूम क्लिनर फिरतो. सर्व भ्रष्टाचारी ते भाजपमध्ये घेत आहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ‘मशाल’ या अधिकृत चिन्हाच्या व नव्या गीताचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. निवडणूक रोखे घोटाळ्यामुळे भाजपचे बिंग फुटले आहे. हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या काळात ही योजना आणली गेली. त्यामुळे त्यांच्या पतीला हा प्रकार नेमका काय आहे तो कळला असेल. त्यांनी त्याला ‘मोदी गेट’ असे नाव दिले आहे. म्हणजेच जगातील सर्वात मोठा घोटाळा. याचा सर्वोच्च न्यायालयात पर्दाफाश झाला नसता तर भाजपला हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिले हे कळलेच नसते आणि ‘चंदा दो, धंदा लो’, हे काम यापुढेही चालू राहिले असते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हुकूमशाही विरुद्ध लोकशाही

ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे. देश हा आपला धर्म म्हणून आपण एकत्र आहोत. जे देशभक्त आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे. देश वाचला तर आपण वाचू आणि आपण वाचलो तर आपला धर्म वाचेल. म्हणून पहिल्यांदा हुकूमशाही हटवा. माझे आव्हान हुकूमशाहीला आहे आणि आवाहन देशप्रेमी जनतेला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in