

मुंबई/छत्रपती संभाजीनगर : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, पण ती तुटपुंजी आहे. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी केली होती, त्यावेळचा डेटा आजही तोच कायम आहे. तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास सरकार चालढकल करत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत मत नाही, असे बोर्डच गावागावात लावा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केले.
उद्धव ठाकरे बुधवारपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. ते ‘दगाबाज रे’ या संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. ५ ते ८ नोव्हेंबर असे चार दिवस ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत.
दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकारकडून मदत मिळाली की नाही? किती मदत मिळाली? असे प्रश्न विचारून आढावा घेत आहेत.
तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला याठिकाणी सभा घ्यायची नाही, कारण मी तुमच्याशी बोलायला आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही इतिहासातील सगळ्यात मोठी मदत आहे. पण त्यांनी मारलेली ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. कारण पॅकेज जाहीर करूनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही, अशी टीका त्यांनी केली.
हे सरकार दगाबाज आहे, त्यामुळे या सरकारशी आपणदेखील दगाबाजी केली पाहिजे. निवडणूक आली म्हणून मी आलो आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे, पण राज्यात आपत्ती आली आहे आणि ती तुमच्या पॅकेजसारखी थोडीच थांबली, असा टोला त्यांनी महायुती सरकारला लगावला.
उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद - फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली. ‘उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत’, असे ते म्हणाले.