शिवसेनेचे नेतृत्व उपरे ठरवणार नाहीत - उद्धव ठाकरे

अमित शहा यांनी शनिवारी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना ‘आता शिवसेना शिंदेंची झाली असून दुसरा कोणता गट राहिलेला नाही’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे
Published on

मुंबई : शिवसेनेचे नेतृत्व कोण करणार हे उपरे ठरवू शकत नाहीत. शिवसेना ही भूमिपुत्रांची आहे आणि शिवसैनिक ठरवतील तोच शिवसेना पक्षप्रमुख होईल. शिवसेनाप्रमुख दुसरा होणे नाही आणि हिंदुह्दयसम्राट तर अशक्यच आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख  उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप नेते अमित शहा यांना नाव न घेता सुनावले.

अमित शहा यांनी शनिवारी  कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना  ‘आता शिवसेना शिंदेंची झाली असून दुसरा कोणता गट राहिलेला नाही’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.

ठाकरे गटातील ६ खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आजपासून पक्ष सोडलेल्या खासदारांच्या मतदारसंघात दौरे आयोजित केले आहेत. त्यानुसार ठाकरे यांनी आज संजय दिना पाटील प्रतिनिधित्व करत असलेल्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप येथे सभा घेतली. यावेळी ते म्हणाले, जिथे गद्दारी झाली तिथे जाऊन मतदारांची माफी मागवणार आहे. शिवसेना आणि मशालीवर लढणारा उमेदवार पाहून शिवसैनिकांनी मतदान केले. चूक माझी आहे, त्यामुळे मतदारांची माफी मागण्यासाठी मी आलो असल्याचे ते म्हणाले.

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा प्रमुख कोण हे उपरा ठरवू शकत नाही. त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्न पडत असतील म्हणून ते इतरांच्या पक्षाचे आमदार, खासदार घेऊन स्वत:चा खुंटा मजबूत करत आहेत, अशी टीका   ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर केली.

यावेळी ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांचाही  समाचार घेतला. युतीमध्ये ही जागा कायम भाजप लढवत असे.  महाविकास आघाडीमध्ये ही जागा हट्टाने आपल्याकडे मागून घेतली. शिवसैनिकांनी कमाल केली. समोरुन पैशाचा धबधबा असताना शिवसैनिकांनी स्वकष्टाने ही जागा निवडून आणली. ही  जागा दिली नसती तर खासदार झाला असतात का? आणि खासदार झाला नसता तर हमीभाव मिळाला असता का? असा सवाल  ठाकरे यांनी केला. तसेच यावेळी  त्यांनी शिवसैनिकांना  उद्देशून  तुमच्या मनातील शल्य आहे त्याचा सूड घ्यावाच लागेल. तयारीला लागा, असे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in