मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत ‘ठेवी चाटायला नसतात’, अशी बोचरी टीका केली होती. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत ‘ठेवी कंत्राटदारांचे बूट चाटायला नसतात’, असा पलटवार केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.
‘बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकीविरुद्ध भाजप न्यायालयात गेली होती, आता महाराष्ट्रातील बिनविरोध निवडणुकीबाबत भाजपने भूमिका स्पष्ट करावी’, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला लगावला. मनसे, ठाकरे सेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वचननामा रविवारी शिवसेना भवनात जाहीर करण्यात आला. त्यावेळी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यात निवडणुका बिनविरोध करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद आदी शस्त्रे वापरली जात आहेत. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. एक प्रकारे राज्यात लोकशाही संपली असून झुंडशाही सुरू झाल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. शिवस्मारक अजून पाण्याखाली आहे, ते बाहेर कधी काढणार, असा सवाल करीत ते म्हणाले की, आम्ही गारगाई- पिंजाळ धरणाऐवजी समुद्राच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प हाती घेतला होता, तो थांबवून कॉन्ट्रॅक्टरसाठी लूट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. कोरोना काळात केलेल्या कामांचे, मुंबई मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कौतुक झाले. सध्या देशात हिंदू नेता असूनही रोहिंग्या-बांगलादेशीची घुसखोरी वाढली, मराठी माणसाचा अपमान, रोजगार आणि भाषेवरील आघात वाढले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा
‘तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनाभवनात आलो. टीव्हीवरील बातम्या बघताना, वीस वर्षानंतर जेलमधून सुटून आलो, अशी भावना मनात आली. वीस वर्षानंतरचे शिवसेनाभवन बघतो आहे. परंतु, माझ्या मनात जुन्या शिवसेनाभवनाबद्दल अनेक रोमांचक आठवणी आहेत. १९७७ साली हे भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर येथे दगडफेक झाली होती, असे सांगत राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. त्याला राज्यकर्ते यूपी-बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील पुढील पिढ्यांचे वाटोळे करणे, राज्याच्या राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्रातील भवितव्यासाठी घातक आहेत. राज्यातील राजकारण्यांनी याचा विचार करावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा ‘ढाण्या वाघ’ असल्याच्या केलेल्या विधानांबाबत राज यांना माध्यमांनी विचारले असता, स्मितहास्य करत फडणवीस यांनी ‘तो’ विनोद केल्याचा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.
मुंबईचा महापौर मराठीच होणार - उद्धव ठाकरे
वरळीतील सभेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, डोममध्ये बरेच ‘डोमकावळे’ जमा झाले होते. जे लोक म्हणतात की मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असावा, त्यांच्यातील अनेक जण शिवसेनेतून गेलेले गद्दार असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आतापर्यंतही शिवसेनेनेच मराठी महापौर दिले आहेत. मात्र, भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत असताना उपमहापौर कुणाला केला होता, हे भाजपने सांगावे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
करमुक्ती व कर सवलत
७०० चौ. फुटांपर्यतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ
सोसायट्यांना १ लाख रूपयांची सबसिडी
कचरा विलगीकरण, गांडुळ खत प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर एनर्जी तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात सवलत देणार.
पर्यावरणस्नेही सोसायट्यांच्या पुनर्विकासासाठी त्यांना अतिरिक्त चटईक्षेत्र देणार.
हे होऊ देणार नाही!
कचरा संकलनासाठी प्रस्तावित कर रद्द करणार.
महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही.
शब्द ठाकरेंचा!
मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरांसाठीच
महापालिकेच्या मालकीच्या जमिनी खासगी विकासकांच्या घशात न घालता तिथे मुंबईकरांची सेवा करणाऱ्या शासकीय, महापालिका, बेस्ट आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच गिरणी कामगारांना हक्काची घरे देणार
मुंबई महापालिकेचे स्वतःचे गृहनिर्माण प्राधिकरण असेल.
पुढील ५ वर्षांत १ लाख मुंबईकरांना परवडणारी हक्काची घरे देणार
घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करणार आणि नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये स्वाभिमान निधी देणार
कोळी मच्छिमार महिला विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना अर्थसाह्य आणि नवीन परवान्यांची तरतूद, ज्यात समुदायांतर्गत परवान्यांच्या हस्तांतरणाची सोय समाविष्ट असेल
कष्टकरी मुंबईकरांसाठी फक्त १० रुपयांत नाश्ता आणि दुपारचे जेवण देणारी ‘माँसाहेब किचन्स’ सुरू करणार
मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर दर २ किलोमीटरला एक अशी महिलांसाठी उत्तम स्वच्छता असलेली शौचालये बांधणार. या स्वच्छतागृहात महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन पॅड व्हेंडिंग मशिन्स असतील. लहान मुलांचे डायपर्स बदलण्याची सोय असेल
नोकरदार, पालक तसेच कष्टकरी महिला यांच्या लहानग्यांना सांभाळणारी पाळणाघरे सुरू करणार
मुंबईच्या प्रत्येक विभागात पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क, पेट क्लिनिक, पेट क्रेश, पेट ॲम्ब्युलन्स, पेट क्रेमॅटोरियम यांची सोय उपलब्ध करून देणार
बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसाह्य योजना
एक लाख तरुण-तरुणींना प्रत्येकी २५ हजार ते १ लाख रुपयांचा स्वयंरोजगार सहाय्यता निधी आणि २५ हजार गिग वर्कर्सना आणि डबेवाल्यांना ई-बाइकसाठी बिनव्याजी कर्ज देणार
दहावीनंतरची गळती रोखण्यासाठी महापालिका शाळा इमारतीत बारावीपर्यंतचे ज्युनिअर कॉलेज सुरू करणार