
आज रत्नागिरीतील खेडमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ((Uddhav Thackeray)) यांनी जाहीर सभा घेतली. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या बालेकिल्ल्यात घेतलेल्या या सभेमध्ये त्यांनी भाजप शिंदे गटासह निवडणूक आयोगावर टीका केली. ते म्हणाले की, "धनुष्यबाण तुम्हीं चोरला असेल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असे नाही. जिथे रावण उताणा पडला तिथे मिंधे काय पेलणार?" असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, " निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर त्यांनी येऊन पहावं. तो चुना लावणारा आयोग आहे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, माझ्या वडिलांनी केली आहे," अशी टीका त्यांनी निवडणूक आयोगावर केली.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करणारे हिंदुत्वाच्या, मराठी माणसाच्या एकीवर घाव घालत आहेत. एवढ्या निष्ठुरपणे, निर्घृणपणे वागत आहेत की ज्यांनी सोबत दिली त्यांना संपवत आहेत. मी 'शिवसेना'च म्हणणार. पक्ष ते देऊ शकत नाही, आम्ही देऊ देणार नाही." असा एल्गार त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "ढेकणाला मारायला गोळीची गरज नसते. आपले बोटच पुरेसे असते. तुमचे बोटाचे मत त्याला पुरेसे आहे. ज्यांना आम्हीं मोठे केले, त्यांनी आईवर वार केला. शिवसेना आमची आई आहे." अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी डोळे मोठे केले आणि हे गप्प बसले. एक काळा टोपीवाला होता, त्याने शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. त्यावेळी हे शेपट्या घालून बसले. तुमचा अर्धा वेळ फिरण्यामध्ये जातो, अर्धा वेळ दिल्लीला मुजरा करायला आणि अर्धा वेळ ज्यांना खोके मिळाले नाहीत, मंत्रीपदे मिळाली नाहीत त्यांना सांभाळायला जातो." असे म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.