मुंबई: भाजपप्रणीत महाराष्ट्र सरकार राज्यातून मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. त्याचबरोबर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता केवळ खाते बदलले याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख "हतबल मुख्यमंत्री" असा केला. शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे विलीनीकरण शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्यासह राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
मराठी भाषेच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, सरकार महाराष्ट्रातून मराठी भाषा संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला कोणत्याही भाषेविषयी तिरस्कार नाही, पण आमच्यावर कोणतीही भाषा लादू नका, असे ते मंत्रालयाजवळील शिवसेनेच्या 'शिवालय' कार्यालयात एका वेगळ्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
जगाचा पोशिंदा बळीराजाचा अवमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता खाते बदलले. रमी खेळणाऱ्यांना क्रीडा मंत्री केले म्हणजे रमीला ऑलिंपिकचा दर्जा मिळणार. आम्ही सत्तेत असताना आरोप करत राजीनाम्याची मागणी करायचे आणि आता खाते बदल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितिमुल्य समिती स्थापन केली होती ती गेली कुठे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला.
महायुती सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून राज्यभरात आंदोलन करत भ्रष्टाचारामुळे उघड झालेले विद्रुप चेहरा जनतेसमोर आणणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिला.
विधानसभा निवडणुकीतील कोणालाच वाटलं नव्हतं असा निकाल अनाकलनीय आहे, निकाल येईल, आता याचे घोटाळे बाहेर पडतातय, लाडक्या बहिणीत किती बापे घुसले कोणी घुसवले, पैसे कुठे गेले याचा हिशेब महायुती सरकारला द्यावाच लागेल. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष वरचढ ठरला, संसदेतही विरोधी पक्षाने भाजप सरकारला पळो की सळो करुन सोडलं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
कोकाटे यांचे मंत्रिपद वाचवले
आताचे खाते बदल झालेले माजी कृषीमंत्री तर शेतकऱ्यांवरच टीका करत होते. शेतकऱ्यांप्रति बेताल वक्तव्य केली. पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. मला वाटले मुख्यमंत्री संवेदनशील असून त्यांचा राजीनामा घेतील. उलट फडणवीस यांनी खाते बदलत कोकाटे यांचे मंत्रिपद वाचवले. यावरून फडणवीस शेतकऱ्यांप्रति किती गंभीर हे स्पष्ट होते, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना काढला.
बुलढाणा, अमरावतीतील पदाधिकाऱ्यांचा सेनाप्रवेश
वणी विधानसभेतील भाजपचे यवतमाळ माजी जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य संघ दिप भगत, माजी जिल्हापरिषद सदस्य दिलिप काकडे यांनी शनिवारी मातोश्री निवासस्थानी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार संजय देरकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते