
मुंबई : लोकसभेच्या काळात महाविकास आघाडीत असलेली एकजूट विधानसभा निवडणुकीत दिसली नाही. जागावाटप, अहंकारामुळे विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत 'खेचाखेच' सुरू राहिली. तू तू मैं मैं झाले. त्याचा जनतेत चुकीचा संदेश गेला. आता त्याच त्याच चुका पुन्हा झाल्यास महाविकास आघाडीत एकत्र येण्याला काहीही अर्थ राहत नाही, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत ठाकरे यांनी
निवडणूक महायुतीवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या काळात मविआत खेचाखेची झाली. आम्ही चार-चार, पाच-पाचवेळा जिंकलेले मतदारसंघ 'आपल्याला जिंकायचयं' म्हणून सोडून दिले. विधानसभा निवडणुकीत चिन्ह होते, पण कोणाला जागा द्यायच्या व उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चीत नव्हते. ही चूक होती. त्यामुळे आम्हाला विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. आता ही चूक सुधारणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
हिंदी सक्तीविरोधात मनसे व शिवसेनेच्या लढ्याला यश आले. यात मराठी माणूस रस्त्यावर उतरला. मराठीचा हा लढा कायम ठेवण्यासाठी भेदभाव गाडून मराठी माणसाची एकजूट बांधा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यातील सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या. काय व्हायचं ते होऊ द्या, अशा शब्दांत ठाकरे यांनी महायुतीला ठणकावले.
राज ठाकरे हे संयुक्त आघाडी उभारण्यासाठी 'ठाकरे ब्रँड' हा शब्दप्रयोग वापरत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत ठाकरे हे फक्त एक 'ब्रँड' नाहीत. ते मराठी माणसाची, महाराष्ट्राची आणि हिंदू अभिमानाची ओळख आहे. काही लोकांनी ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. कारण त्यांना त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही सत्तेत येऊ नये, असे वाटत आहे. त्यामुळेच जून २०२२ मध्ये, एकनाथ शिंदे आणि पक्षाच्या ३९ आमदारांच्या बंडानंतर शिवसेना फुटली आणि मविआ सरकार कोसळले.
दरम्यान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी टीकास्त्र सोडले. ज्यांना १०० वर्षे पूर्ण करूनही कोणत्याही क्षेत्रात काहीही निर्माण केले नाही किंवा कोणताही आदर्श ठेवला नाही, त्यांनी 'ठाकरे ब्रँड' चोरण्यास सुरुवात केली. मात्र पक्षाचे निवडणूक चिन्ह चोरू शकता, परंतु कुटुंबावरील लोकांचे प्रेम आणि विश्वास कसा चोराल? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीका करत पक्षाचे निवडणूक चिन्ह काढून ते घेऊ शकत नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर केला.
ठाकरे हे महाराष्ट्राची ओळख
ठाकरे हे केवळ ब्रँड नाही तर महाराष्ट्राची, मराठी माणसाची आणि हिंदुत्वाची ओळख आहे. काही जण ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून मराठी माणसांशी आमचे नाते मजबूत आहे. आता मी, आदित्य इथे आहेत आणि अगदी मनसे प्रमुख राज ठाकरे हे ही त्यात आले. ठाकरे म्हणजे सतत संघर्ष हे ठरून गेले आहे. आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि माझे वडील तथा शिवसेना संस्थापक बाळासाहेबांनी पक्षाला दिलेले नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार, निवडणूक आयोगाला नाही, असे ठाकरे यांनी ठणकावले.
मॅच फिक्सिंग मुलाखत - मुनगंटीवार
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत ही घरगुती असून मॅच फिक्सिंग आहे. त्यात प्रश्न आधीच ठरलेले असतात, मुलाखतीतुन आपले कौतुक करून घेण्याचा हा प्रकार आहे. अशा मुलाखती लोकांना आवडत नसतात, अशा या शब्दात भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा समाचार घेतला.