मुंबई : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मंगळवारपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असून ते इंडिया आघाडीतील नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांशी ठाकरे विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाची चर्चा करणार असल्याचे समजते.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. ठाकरे यांचा हा संवाद दौरा असून ते तृणमूल काँग्रेस, सपा आणि आपच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही ठाकरे चर्चा करणार आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी येथे सांगितले.