
सालियन प्रकरणात तथ्य नाही! ...तर हे तुमच्यावरच ‘बुमरँग’ होईल - उद्धव ठाकरे
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे काय पुरावे आहेत, ते न्यायालयात द्यावेत. जे काय आहे ते कोर्टात द्या. आमच्या घराण्याच्या सहा ते सात पिढ्या जनतेसमोर आहेत. आमचा या प्रकरणात दुरान्वयानेही संबंध नाही. पण राजकारण वाईट बाजूने न्यायचे असेल तर मात्र सर्वांचीच पंचाईत होईल. तुम्ही खोट्याचा नायटा करत असाल तर तुमच्यावरही हे बुमरँग होऊ शकते, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी आता हायकोर्टात धाव घेतल्याने गुरुवारी विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले. सत्ताधाऱ्यांकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकीकडे शेतकऱ्यांच्या चिता जळत आहेत, त्याचे काय? संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यांच्या हत्येचे काय? मात्र दिशा सालियन आणि ठाकरे कुटुंबाचा काहीही संबंध नाही.”
“भाजपचे आमदार नगरविकास खात्यात आणि ठाण्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत आहेत. त्याचवेळी नागपूरमध्ये दंगल घडली, हा निव्वळ योगायोग आहे का? बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली आहे. ही नेमकी कोणी घडवली? हा संशोधनाचा विषय आहे. हे सरकार आपले अपयश लपवण्यासाठी एक-एक गोष्टी करायला बघत आहे. मात्र, त्यात ते अधिकाधिक अपयशी होत आहेत. या सरकारच्या कारभाराचे धिंडवडे दिवसागणिक सर्वांसमोर येत आहेत. त्यामुळे वेळ मारून नेण्यासाठी हा सर्व कारभार चालू आहे,” अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
ते म्हणाले की, “औरंगजेबाचे थडगे काढायचे असेल तर काढून टाका. कोणताही शिवप्रेमी हा औरंगजेबाच्या थडग्याबाबत भूमिका घेणार नाही. त्यामुळेच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालादेखील धन्यवाद देतो की, त्यांनी वेळीच भाजपचे कान टोचले आहेत. मात्र हे टोचलेले कान किती दिवस उपयोगी पडतील, हे पाहावे लागेल.”
आम्ही न्यायालयातच बोलू - आदित्य ठाकरे
गेल्या पाच वर्षांपासून माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे आम्ही न्यायालयातच बोलू. या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे का? या मुद्द्यावर मला जायचे नाही. गेल्या पाच वर्षांपासून मी केवळ मुद्दा मांडत आलेलो आहे आणि मुद्द्याचेच बोलत राहणार, असे आदित्य ठाकरे म्हणाले.