
मुंबई : राज्यातील फडणवीस सरकार त्रिभाषा धोरणाची सक्ती करणार असेल तर आमचा त्याला कायम विरोध राहील, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
विधानसभेच्या आवारात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत, काही महिन्यांमध्ये, सत्ताधाऱ्यांचा जो माज आहे, मी याला राजकारण म्हणत नाही. तर, सत्तेचे ‘माज’कारण म्हणत आहे. कुठे बॉक्सिंग होते, कुठे नवीन चड्डी बनियन गँग आली आहे, तिचा प्रताप आपण पाहत आहोत. उघडलेले खोके बघत आहोत, याच्यानंतर गुरुवारी विधिमंडळाच्या आवारातील हाणामारी पाहिली. देशात महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागेल, अशा घटना गेल्या काही दिवसांत घडत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कालच्या मारहाणप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. जर विधान भवनाच्या आवारात मारामाऱ्या होत असतील तर, मला खरोखर लाज वाटते. देशात आपल्या महाराष्ट्राची प्रतिमा काय झाली असेल. आजपर्यंत असे कधी झाले होते, असे माझ्या तरी आठवणीत नाही. या गोष्टीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली आहे, काय करणार ही उच्चस्तरीय समिती? मूळ हे आहे की, प्रत्येक पक्षात राजकारण्यांनी सत्तेच्या लालसेपायी गुंडांना घेतले. दाऊदच्या साथीदारांसोबतचे पार्टीचे व्हिडीओ, इक्बाल मिरचीसोबत भागीदारी, कोणाचे आणखी कोणासोबत संबंध, या सगळ्या गोष्टींमध्ये आरोप करणारे तेच (भाजप). पक्षात घेणारेही तेच, आरोप मागे घेऊन त्यांना चंदनाचा टिळा लावणारे तेच. अशा लोकांकडून दुसरी अपेक्षा काय करावी? लोकशाहीचा खून करणारे राजकारणी विधिमंडळात आणि महाराष्ट्रात वावरायला लागले तर, जनतेने काय करायचे?”, असा सवाल त्यांनी केला.
विधिमंडळाचे अधिवेशन जनता मोठ्या आशेने पाहत असते की, माझ्या प्रश्नाला नेमके काही उत्तर मिळाले की नाही? काल मी आलो होतो. तेव्हा आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि त्यांचे शिष्टमंडळ आले होते. त्यांना मंत्र्यांनी काल आणि आजही भेट दिली नाही. काही घोटाळे आम्ही बाहेर काढले, त्याच्यावरती तुमच्या काळात काय झाले, आमच्या काळात काय झाले, आम्ही काही गुन्हा केला असेल तर तुम्ही तो आमच्या पदरात जरूर टाका. पण आज तुम्ही आहात, जवळपास हे तिसरे, चौथे वर्ष आहे. तुमच्या सत्तेचा काळ सुरू आहे, त्यामुळे आज जे काही घडत आहे, याची जबाबदारी तुम्ही काल काय घडले, कोणाच्या काळात घडले, असे बोलून झटकू शकत नाही. जे जाही घडत आहे, याची जबाबदारी आजच्या सत्तेने घेतलीच पाहिजे. पुढे असे घडू नये, यासाठी काय उपाययोजना करणार, हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
निवडणुका आल्यावर युतीबाबत चर्चा करू!
राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या आम्ही फक्त मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो आहोत, निवडणुका आल्यावर राजकारणात एकत्र येण्याबाबत चर्चा करू.