ठाकरे बंधूंच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार; ५ जानेवारीला सभेच्या झंझावाताला सुरुवात

मुंबईसह राज्यात ठाकरे बंधूंनी प्रचारासाठी जय्यत तयारी केली असून येत्या ५ जानेवारीला सभेच्या झंझावाताला सुरुवात होणार आहे. त्या आधी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त सभा घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र छायाचित्र : एक्स
Published on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निश्चित उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात मुंबईसह राज्यात ठाकरे बंधूंनी प्रचारासाठी जय्यत तयारी केली असून येत्या ५ जानेवारीला सभेच्या झंझावाताला सुरुवात होणार आहे. त्या आधी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे संयुक्त सभा घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत. ठाकरेंसाठी मुंबई प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही बंधूंच्या तीन सभा मुंबईत होणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिल्यादांच दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा हाताळल्यानंतर आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही बंधूंची एकत्र सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, दोन्ही पक्षांकडून मोर्चेबांधणी झाली आहे. बंडोबांची नाराजी दूर करण्याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर असणार आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधूंची संयुक्त सभा ते वचननामा याबाबतचा संपूर्ण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. ५ जानेवारीला संयुक्त सभा होणार असून त्या आधी ४ जानेवारीला पत्रकार परिषद घेऊन दोन्ही बंधू संयुक्तपणे जाहीरनामा प्रकाशित करणार आहेत.

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये सभा

मुंबई आणि मुंबईतील मराठी माणसाच्या दृष्टीने विविध संकल्पना या जाहीरनाम्यात मांडण्यात आल्याचे समजते. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या तीन संयुक्त सभा होईल. पूर्व उपनगरात एक, दुसरी पश्चिम उपनगरात आणि शेवटची मुंबई शहरात सभा घेऊन प्रचाराची सांगता होणार आहे. केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथेही संयुक्त सभा होणार आहेत.

युवा नेत्यांकडे प्रचाराचे नेतृत्व

दरम्यान, शिवसेना नेते युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी शिवतीर्थ येथे जाऊन आपले बंधू, मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीत त्यांनीही आपल्या संयुक्त प्रचाराची रणनीती आखली. दोन्ही युवा नेत्यांकडे प्रचाराचे नेतृत्व सोपवण्यात आल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in