पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."

२०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या सभेत मला लहान भाऊ म्हणाले होते. जर, मी लहान भाऊ होतो तर, माझ्याशी नाते का तोडले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या सभेतून मोदींना केला.
पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या 'त्या' टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर; "वखवखलेला आत्मा..."
Published on

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात (ता.२९ एप्रिल) जाहीर सभा पार पडली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा उल्लेख 'भटकती आत्मा' म्हणून केला होता. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख 'वखवखलेला आत्मा' असा केला. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पुण्यात मंगळवारी (३० एप्रिल) सभा घेतली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर तोफ डागली.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?

पुण्याच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, "अजित पवार म्हणाले की, मी मोदींना पुढच्या सभेत विचारेन की, ते भटकती आम्हा कुणाला म्हणाले? भटकती आत्मा तुम्ही पवारसाहेबांना म्हणालात? जशी भटकती आत्मा असतो ना तसा वखवखलेला आत्मा सुद्धा असतो आणि हा वखवखलेला आत्मा कसा असतो. तो सगळीकडे जातो", अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली.

इतकी वखवख बरी नाही

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, एक वखवखलेला आत्मा ३५० वर्षापूर्वी गुजरातमध्ये जन्माला आला होता. हा आत्मा छत्रपती शिवाजी महाराजा यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य चिरडण्यासाठी आणि महाराष्ट्र ताब्यात घेण्यासाठी आला होता. औरंगजेब २७ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. यानंतर त्याने पु्न्हा आग्रा बघितलाच नाही. आता त्याचा आत्मा इकडे कुठेतरी भटकत असेल. इतकी वखवख बरी नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला.

...तर नाते का तोडले?

२०१४ आणि २०१९ मध्ये पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या सभेत मला लहान भाऊ म्हणाले होते. जर, मी लहान भाऊ होतो तर, माझ्याशी नाते का तोडले? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी पुण्याच्या सभेतून मोदींना केला.

नेमके काय म्हणाले होते मोदी?

१९९५ मध्ये राज्यात सेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. मात्र, ‘भटकती आत्मा’ तेव्हाही या सरकारला अस्थिर करण्याचा डाव खेळत होता. २०१९ मध्येही त्यांनी जनादेशाचा अपमान केला. महाराष्ट्रानंतर आता देश अस्थिर करण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. महाराष्ट्राला अशा भटकत्या आत्म्यांपासून वाचविले पाहिजे. महाराष्ट्रात महायुती मजबूत आहे. या मजबुतीनेच त्यांनी पुढे जावे. मागच्या २५ ते ३० वर्षांत ज्या उणिवा राहिल्या. त्या आपण दूर करुया. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नक्कीच नवी झेप घेईल. त्याचबरोबर एनडीए आघाडी सरकार महाराष्ट्राला नवीन उंचीवर नेल्याशिवाय राहणार नाही, असे मोदी म्हणाले होते.

logo
marathi.freepressjournal.in