छत्रपती संभाजीनगर: भाजपशी तीन दशके आघाडी असूनही शिवसेनेने आपले अस्तित्व अबाधित राखले. त्यामुळे शिवसेना काँग्रेस होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. हिंगोली, कळमनुरी आणि वसमत मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
शिवसेना पक्ष म्हणजे काँग्रेसची आणखी एक आवृत्ती झाल्याची टीका भाजपने केली होती, त्याला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. भाजपसमवेत आपल्या पक्षाची तीन दशके आघाडी होती, तरी शिवसेनेने आपले अस्तित्व अबाधित राखले, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा येथे येऊन आमच्यावर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी सोडल्याची टीका करतात, मात्र आपण शिवसेनाप्रमुखांची विचारसरणी सोडलेली नाही तर भाजपला सोडले आहे. भाजप हा शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदी यांच्या 'एक है तो सेफ है' बद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही एकत्रच आहोत आणि एकत्रित राहून भाजपला हद्दपार करणार आहोत.
मोदींची १५ लाखांची गॅरंटी १५०० वर आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची गॅरंटी दिली होती, मात्र १५ लाखांची गॅरंटी १५०० रुपयांवर आली अन् आता निवडणुकीनंतर १५ पैशांवर येईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी कळमनुरी येथे बोलताना केली.
राज्यात मोदींची नव्हे, बाळासाहेबांची गॅरंटी चालते
राज्यात पाणी, चांगले रस्ते नाहीत, असे सरकार कशाला हवे? हे सरकार बदलण्याच्या निश्चयाने आम्ही निवडणुकीच्या मैदानात आलो आहोत. राज्यात मोदींची नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गॅरंटी चालते, असा दावाही त्यांनी केला.
गद्दारांना तुरुंगाची हवा खावी लागणार
राज्यात शिवसेना उमेदवाराच्या समोर बहुतांश ठिकाणी गद्दार उभा आहे. या गद्दारांना मागील निवडणुकीत उमेदवारी दिली ही आपली चूक झाली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले, पण त्यांनी गद्दारी केली. गद्दार विकला जातो, पण निष्ठावंत विकला जात नाही. राज्यातील जनतेला छळणाऱ्या या गद्दारांना तुरुंगाची हवा खाऊ घालणार असून या गद्दारांना रसातळाला न्या, म्हणजे यापुढे कोणी गद्दारी करण्याची हिंमत करणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.