भाजपचा स्थापना दिवस सोयीनुसार; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला, प्रभू रामचंद्रांप्रमाणे वागण्याचा दिला सल्ला

वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन मित्रांना देणार, हे भाजपचे ठरले आहे. पुढची पायरी ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, हिंदू देवस्थानांची जमीन ते काढून घेतील आणि मोक्याच्या जमिनी मित्रांना देतील. कुठल्याही समाजाबद्दल भाजपला प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त...
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : रविवार, ६ एप्रिलला देशभरात रामनवमी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत असताना भाजपने याच दिवशी पक्षाचा ‘स्थापना दिन’ साजरा केला. भाजपचा स्थापना दिन हा तिथी, तारीख की सोयीप्रमाणे आहे, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. तसेच रामनवमी उत्सव साजरा करता तर प्रभू रामचंद्र जसे वागले तसे वागण्याचा प्रयत्न करा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘शिव संचार सेने’च्या लोगोचे अनावर रविवारी करण्यात आले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, अखिल चित्रे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीचे सरकार निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना अधिक पैसे देऊ, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे सांगत होते. आता दिलेल्या आश्वासनांबद्दल ‘प्राण जाये, पर वचन ना जाये,’ असे महायुतीला सांगण्याची गरज आहे. महायुतीने लोकांना फसवून मते घेतली आहेत. खरेतर रामाचे नाव घेण्याची पात्रता भाजपमध्ये नाही, असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.

वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन मित्रांना देणार!

वक्फ बोर्डाच्या जमिनी घेऊन मित्रांना देणार, हे भाजपचे ठरले आहे. पुढची पायरी ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, हिंदू देवस्थानांची जमीन ते काढून घेतील आणि मोक्याच्या जमिनी मित्रांना देतील. कुठल्याही समाजाबद्दल भाजपला प्रेम नाही. यांचे प्रेम फक्त मित्रांपुरते असून यालाच आम्ही विरोध केला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे भाषण पूर्ण मुस्लिमांच्या बाजूने आहे. मग आम्ही हिंदुत्व सोडले हे भाजप कसे बोलू शकते?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

धर्मा-धर्मात भांडण लावून झुंजवत ठेवायचे, दंगली घडवून आणायच्या, पोलिसी ससेमिरा लावायचा, मग बुलडोझर चालवायचे, केसेस दाखल करायच्या. लोकांना रोज तणावग्रस्त स्थितीत जगायला लावायचे, असा आरोप त्यांनी केला.

भाजप देशात विष पेरण्याचे काम करतेय!

भाजप देशात धर्मांधतेचे विष कालवत आहे. हे विष देशाला खूप भारी पडणार आहे. याबाबत जातपातीच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे डोळे उघडले पाहिजेत. तसेच ही विषवल्ली पेरणाऱ्यांना आपण दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

logo
marathi.freepressjournal.in