नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ‘टॅरिफ’चा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशाची खिल्ली उडवत आहेत. मात्र, आपण त्यांना चोख उत्तरही देत नाही. पंतप्रधानांनी अद्याप अवाक्षरदेखील उच्चारले नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून प्रहार केला.
सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे म्हणाले की, “देशाचे सरकार नेमके चालवतेय कोण? आपल्या देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांची गरज आहे, हे मी आधीच बोललो आहे. कारण आत्ताचे पंतप्रधान हे भाजपचे आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ झाल्यानंतर मोदी बिहारला गेले पण पहलगामला गेले नाहीत. या सरकारकडे परराष्ट्र नीती नाही, खंबीर धोरण नाही. अमेरिका डोळे वटारत असताना डोवाल रशियाला गेले आहेत. पंतप्रधान चीनला चालले आहेत. चीन तरी त्यांच्यासाठी दरवाजे उघडणार आहे का? हे सगळे पाहता परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, हे निश्चित.”
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना ईव्हीएमवर आमचा आक्षेप आहे. त्यात आता अपारदर्शकता म्हणजे, व्हीव्हीपॅट मशीनच काढून टाकले आहे. मग निवडणुका घेताच कशाला? जाहीर करा की, आमचे इतके जिंकले. बटण दाबले जाते आहे, दिवा लागतो आहे, रिसिट दिसते आहे पण रजिस्टर्ड कुठे होत आहे दिसत नाही. बॅलेट पेपरवर स्पष्ट कळत होते. आता व्हीव्हीपॅट काढणार असाल तर निवडणुका घेण्याचा फार्स घेता कशाला?” अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
युतीचा निर्णय आम्ही भाऊ घेऊ - उद्धव
“युतीचा निर्णय आम्ही दोघे घेऊ, तिसऱ्याची गरज नाही. युतीसंदर्भातील निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत. राज ठाकरेंबाबत दुसऱ्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमचे बघू. इंडिया आघाडीत कोणत्याही अटीशर्ती नाहीत. राज आणि आम्ही निर्णय घेण्यात सक्षम आहोत,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीत कोणाचाही हस्तक्षेप होणार नसल्याचे संकेत दिले.