

"इदच्या निमित्ताने भाजपने 'सौगात-ए-मोदी' हा कार्यक्रम हाती घेतलाय. जवळपास ३२ हजार भाजप कार्यकर्ते ३६ लाख मुस्लिम कुटुंबाच्या घरोघरी जाऊन सौगात-ए-मोदी देणार आहेत. पण हे काही 'सौगात-ए-मोदी' नाही तर 'सौगात-ए-सत्ता' आहे. सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्याचं हे निर्लज्ज उदाहरण आहे", असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपवर केला.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली, त्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी काल संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. सरकारचं अपयश लपवणारं अधिवेशन होतं. १०० दिवसांचा संकल्प या सरकारने केला होता. पण सरकारला या संकल्पाचा विसर पडला, अशी टीका केली. तसेच, १०० दिवसांत काय घडलं? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी बीडमधील सरपंचांची हत्या , सोमनाथ सूर्यवंशींची हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण, मुंबईत रस्ता घोटाळा, लाडक्या बहिणींना आश्वासन देऊनही न वाढवलेले पैसे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, नागपूर दंगल हे मुद्दे उपस्थित करीत निशाणा साधला.
सौगात-ए-मोदी नव्हे सौगात-ए-सत्ता
महाराष्ट्राच्या निवडणुकीवेळी 'बटेंगे तो कटेंगे' नारा देणारे आता 'सौगात-ए-मोदी' म्हणत आहेत. वर्षभर किंवा आयुष्यभर मुस्लीम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आल्या की पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला.
आता मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार?
तुम्ही आमच्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप करता, पण तो आरोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यामधून हिरवा रंग आधी काढा, असे आवाहन ठाकरेंनी भाजपला दिले. 'आता त्यांचं तोंड उघडं पडलं आहे. मोदी जे लोकसभा निवडणुकीच्या वेळी म्हणाले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार वगैरे. मला चिंता याची आहे की आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार?', असा सवालही त्यांनी विचारला.
भाजपने हिंदूत्व सोडल्याचं जाहीर करावं
'सौगात-ए-मोदी'ची भूमिका कायम राहणार की केवळ निवडणुकीसाठी असणार आहे. कारण महाराष्ट्रात अनेक आश्वासने देऊन, थापा मारुन सत्ता मिळवली आणि आता आम्ही त्या गावचेच नाही असे दाखवतात. तसंच 'सौगात-ए-मोदी' बिहार निवडणुकीपुरती राहणार की नंतरसुद्धा राहणार हे जाहीर करावं आणि हिंदूत्व सोडलेलं आहे हे त्यांनी अधिकृतपणे जाहीर करावं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.