
मुंबई : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे-शिवसेना एकत्र आले. मात्र युतीबाबत अद्याप कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी ‘निवडणुका जाहीर तर होऊ दे,’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाला चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. २० ऑगस्टला शिवसेना चिन्ह व पक्ष याचा निकाल देणार, हे समाधानकारक आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही वर्षांपूर्वी एअर फोटोग्राफी केली होती, ती गडकिल्ल्यांची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, ही अभिमानाची बाब आहे.”
स्मारकाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे रखडले आहे. तरीही बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले तर ते अधिक सांगतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला.