सभागृहांत विरोधी पक्षनेते नेमण्यास सरकार घाबरतेय; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते नियुक्त न केल्याबद्दल राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारला एक वर्ष झाले आहे. मात्र, बहुमत असूनही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमण्यास सरकार घाबरत आहे.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते नियुक्त न केल्याबद्दल राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सरकारला एक वर्ष झाले आहे. मात्र, बहुमत असूनही दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमण्यास सरकार घाबरत आहे. हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, बहुमताचे सरकार असूनही सरकार दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांचीकडे नियुक्ती करण्यास घाबरत आहे. विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केलीच पाहिजे आणि आम्ही याची सातत्याने मागणी करत आहोत. सरकार अपयशी ठरले तर इतिहासात प्रथमच एकही विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन पार पडेल, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरोधकांमधील सर्वाधिक २० आमदार असून पक्षाने आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदासाठी निवड केली आहे तर विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांच्या कार्यकाळानंतर काँग्रेसने सतेज पाटील यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. मात्र, सरकारने अजूनही विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक केलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो दाखल करावी

महाराष्ट्राच्या मतदार यादीतील गोंधळ सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओमोटो) दाखल करावी, अशी मागणी केली तसेच त्रुटी दुरुस्त होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नयेत, असा आग्रह विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धरावा. त्रुटीपूर्ण मसुदा मतदार याद्या संपूर्ण निवडणुकीवर परिणाम करत असल्याचा आरोप ठाकरे उद्धव ठाकरे यांनी केला. दरम्यान, स्थानिक निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात महायुतीत दिसलेल्या अंतर्गत वादांना त्यांनी सत्तेच्या लोभाचे लक्षण म्हटले.

...तर मग उपमुख्यमंत्रीपदही रद्द करा

गेल्या वर्षभरात सरकारने जाहिरातींशिवाय काही काम केले नाही. दुसरीकडे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नेमलेले नाहीत. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी नेतेपद हे घटनात्मक पद आहे. जर विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली जात नसेल तर मग घटनात्मक नसलेले उपमुख्यमंत्रीपदही रद्द केले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

पुण्यातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्री येथे शनिवारी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले, भाजप माथाडी पुणे शहराध्यक्ष अक्षय भोसले आणि मातंग एकता आंदोलनाच्या आरती मिसाळ, क्रांतिवीर झोपडपट्टी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश परदेशी, छावा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

logo
marathi.freepressjournal.in