महायुतीची सत्ता जाण्याच्या मार्गावर; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

सत्तेच्या नादी लागून अनेकजण सत्ताधारी महायुतीत गेले. पण आत्ता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे ते तिकडे आपल्या कपाळाला हात लावून बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवला.
महायुतीची सत्ता जाण्याच्या मार्गावर; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
Photo : (@ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : सत्तेच्या नादी लागून अनेकजण सत्ताधारी महायुतीत गेले. पण आत्ता भाजपची सत्ता जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे ते तिकडे आपल्या कपाळाला हात लावून बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चढवला.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ‘मातोश्री’वर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “एक नवीन सुरुवात संपूर्ण देशामध्ये होत आहे. कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणे सुरू आहे की महाराष्ट्रात जणू काही बेबंदशाही सुरू आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या ३०० खासदारांना अटक करण्यात आली. सत्ताधारी लोक मतांची चोरी करून सत्तेत बसलेत. ती चोरी आता पकडली गेली आहे. याविषयी हे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार होते. पण त्यांना जाऊ देण्यात आले नाही.”

“आता एकेक करून आपल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या निघत आहेत. यांची नाटके लोकांनी ओळखली आहेत. सत्तेच्या नादाला लागून भलेभले बिघडले आहेत आणि आता त्यांच्यावर कपाळावर हात मारायची वेळ आली आहे. कारण सत्ता जाण्याची वेळ आली आहे. भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात तिथे गेले आहेत, ते आता कपाळावर हात मारून बसले आहेत,” अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला.

“दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी आपल्या न्याय्य हक्कासाठी दिल्लीला जात होते. पण केंद्र सरकारने त्यांच्या मार्गात खिळे रोवले, मोठे बॅरिकेड्स लावले. आता जनतेने निवडून दिलेल्या खासदारांनाही प्रश्न विचारता येत नाहीत. मंत्र्यांचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. हे किती दिवस सहन करायचे? एकूणच हे थापा मारून आलेले हे सरकार आहे. राज्यातही तसेच सरकार आहे. आता आपण जनतेच्या हितासाठी काम करू,” असे मार्गदर्शन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सोमय्यांनी ईव्हीएम हॅक केले होते - संजय राऊत

भाजपच्या एका नेत्याने ईव्हीएम कशी हॅक होते, याचे प्रात्यक्षिक दाखवल्याचे उद्धव ठाकरेंनी सोमवारी सांगितले होते. शिवसेना भवनमध्ये दाखवलेल्या या प्रात्यक्षिकाला बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी आणि मी उपस्थित होतो. ईव्हीएम हॅकरला घेऊन येणारा नेता दुसरा-तिसरा कुणी नसून किरीट सोमय्या आहे. मशीन हॅक करू, असे सोमय्यांनी सांगितल्यावर उद्धव ठाकरेंनी त्याला रोखले. आपल्याला असे काही करण्याची गरज नाही. राज्यातील जनता आपल्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरेंनी सोमय्याला खडसावले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in