ठाकरे गटाने कंबर कसली; गळती थांबविण्यासाठी मास्टर प्लान, आदित्य यांच्यासह ६० नेते लागले कामाला

राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेना (उबाठा) गटाला सोडचिठ्ठी देत असल्याने त्यांना थोपविण्याचा आटापिटा करण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे.
आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिवसेना (उबाठा) गटाला सोडचिठ्ठी देत असल्याने त्यांना थोपविण्याचा आटापिटा करण्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आता पक्षाच्या आमदार आणि खासदारांशी स्वतंत्र चर्चा करणार असल्याचे वृत्त असून त्यांनी मातोश्रीवर नेत्यांशी याबाबत चर्चा केली.

महत्त्वाच्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले होते. यानंतर आता खासदार, आमदारांसोबत स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आहेत.

ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. मुंबईतील पदाधिकारीही उघडपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. असेच सुरू राहिले तर आगामी महापालिका निवडणुका ठाकरे गटाला जड जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या सगळ्याचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसल्याचे सांगितले जात आहे.

पक्ष बळकटीकरण आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता, उपनेते, सचिव यांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील काही जण पक्षविरोधी काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काही नेते, पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. तसेच यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे बोलले जात आहे.

आता दर आठवड्याला आढावा बैठक घेणार

ठाकरे गटाचे नेते आता सावध भूमिकेत आहेत. ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात दर आठवड्याला आढावा बैठक होऊ शकते. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेत सध्या आदित्य ठाकरे आणि इतर १४ जणांवर नेते पदाची, ४३ जणांवर उपनेतेपदाची आणि १० जणांवर सचिवपदाची जबाबदारी आहे. यापैकी ठाकरेंच्या शिवसेनेमधील १४ महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. सध्या ठाकरे गटातून बाहेर पडल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना-भाजप यापैकी एका पक्षाची निवड करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in