रायगडमधील खालापूर तालुक्यात झालेल्या इर्शाळवाडी भूस्खलन होऊन झालेल्या आपत्तीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेला दोन दिवस झाले असले तरी एनडीआरएफ पथक अजून तिथे शोधकाम करत आहे. या ठिकाणावरून आतापर्यंत २२ मृतदेह काढण्यात आले आहेत. अजून काही मृतदेह सापडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातत्याने कोसळणारा पाऊस आणि धुकं यामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
नेत्यांच्या भेटी वाढल्या
दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी अपघातग्रस्त भागाला भेट दिली आहे. आदित्य ठाकरे, विरोधी पक्षातील नाना पटोले यांनीही या भागाला भेट दिली. अपघातग्रस्तांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इर्शाळवाडीत पोहोचले. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुम्हाला साथ देऊ, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना केले. इर्शाळवाडीची घटना सर्वच राजकारण्यांसाठी लाजिरवाणी आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनीही गावकऱ्यांनी संवाद साधताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यात कुठेही राजकारण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही उद्धव ठाकरेंनी ग्रामस्थांना दिली आहे. जोपर्यंत तुम्हा सर्वांचे पुनर्वसन होत नाही, जोपर्यंत तुमचे जीवन मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही सर्व तुमच्या मदतीला आहोत, अशी ग्वाहीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. '
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आणि जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली होती.