मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांना अटक केली होती. आता ऐन लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा ठाकरे गटात फूट पाडण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि सचिव म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याबाबत काही माध्यमांमध्ये बातम्याही झळकल्या.
मिलिंद नार्वेकर यांना ठाकरे गटातील सर्व गोष्टींची माहिती आहे. नार्वेकरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल आणि कोंडी करता येईल असा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. एकतर एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पर्याय नार्वेकरांसमोर ठेवल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे संबंधही चांगले झाले आहेत. नार्वेकर यांना राजकारणाची उत्तम जाण असल्याची माहिती फडणवीसांना आहे. त्यामुळे नार्वेकरांना जोडीला घेण्यास फडणवीसही जोरदार प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, यापूर्वी नार्वेकरांच्या गणपती पूजेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट हा एक चर्चेचा विषय झाला होता.
'फ्री प्रेस'च्या मेसेजवर नाही दिले उत्तर
नार्वेकर यांनी शिंदे गटात प्रवेश करावा आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे. तसेच ठाकरे गटाचे मातोश्री हे निवासस्थान वांद्रे (पूर्व) येथे आहे. नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वास व्यक्ती आहे. त्यामुळे नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत फ्री प्रेस जर्नलने त्यांना मेसेजद्वारे विचारणा केली होती. त्यावर त्यांच्याकडून अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. तथापि, शिंदेंना नार्वेकरांबाबतचा प्रश्न विचारला असता त्यांनी हसून, उत्तर देण्यास टाळाटाळ केली आणि अद्यापही त्यांनी माझ्याशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले.