उद्धव ठाकरेंचे ‘डॅमेज कंट्रोल’! मातोश्रीवर आत्मचिंतन बैठक

कोकणातील ठाकरेंचे एकमेव आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव नाराज असल्याने ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आत्मचिंतन बैठक बोलावण्यात आली होती. “पक्ष सोडून जाताहेत, तेही कोकणातील नेते जाणे हे पक्षासाठी चांगले नाही. मात्र पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवणार, पक्षगळतीवर मात करणार,’’ असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नाहीत. दोन दिवसांपूर्वी राजापूर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यात आता कोकणातील ठाकरेंचे एकमेव आमदार आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव नाराज असल्याने ‘डॅमेज कंट्रोल’साठी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी आत्मचिंतन बैठक बोलावण्यात आली होती. “पक्ष सोडून जाताहेत, तेही कोकणातील नेते जाणे हे पक्षासाठी चांगले नाही. मात्र पक्ष सोडून जाणाऱ्यांना थांबवणार, पक्षगळतीवर मात करणार,’’ असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. दरम्यान, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीला विनायक राऊत, अंबादास दानवे, संजय राऊत, अनिल परब, अरविंद सावंत आदी नेते उपस्थित होते. तसेच भास्कर जाधव हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते.

ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील नेते भास्कर जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच, मातोश्री निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पक्षाला लागलेल्या गळतीवर विशेष करून कोकणातील नेत्यांच्या नाराजी वर चर्चा झाली.

“आजपर्यंत अनेक जण पक्ष सोडून गेले असले तरी संघटना टिकून आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते असून ते पक्षावर नाराज नाहीत. त्यांच्यावर पक्षाच्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. भास्कर जाधव यांच्याशी पक्षप्रमुखांचा नेहमी संपर्क असतो. आज ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला हजर होते,” असे दानवे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेना नेत्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. पक्ष बांधणीसाठी अधिक जोमाने कामाला लागा, असे निर्देश आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत.

क्षमतेप्रमाणे संधी मला मिळाली नाही -भास्कर जाधव

राजकारणाच्या सुरुवातीलाच मला बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद लाभले. महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रातील लोकांशी मी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटे बोललेले मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. पण माझे दुर्दैव मला सतत आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही,” अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.

logo
marathi.freepressjournal.in