उद्धव ठाकरेंचा आजपासून राज्यात जनसंवाद दौरा, १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत 'असा' असेल कार्यक्रम

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे.
उद्धव ठाकरेंचा आजपासून राज्यात जनसंवाद दौरा, १ ते ५ फेब्रुवारीपर्यंत 'असा' असेल कार्यक्रम

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद दौऱ्याची सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १ फेब्रुवारीपासून जनसंवाद यात्रेसाठी रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे कार्यकर्ते तसेच जनतेशी संवाद साधणार आहेत.

आमदार अपात्र प्रकरण विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचे जनतेला सांगितले होते. यापुढे जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या पहिल्या सभेची सुरुवात रायगड येथून होणार आहे. १ फेब्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता पेण शहर हायस्कूलजवळ उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता चौल (अलिबाग), सायंकाळी सहा वाजता रोहा येथे तर शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सकाळी म्हसळा शहर, दुपारी तीन वाजता पोलादपूर शहर आणि सायकांळी ६ वाजता माणगाव-मोर्बा रोड मैदान, माणगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होणार आहे.

रायगडच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी जनसंवाद यात्रेमधून सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथे जनतेशी संवाद साधणार आहेत. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी सावंतवाडी येथे उद्धव ठाकरेंचे भव्य स्वागत केले जाणार आहे. तेथून ते किल्ले सिंधुदुर्ग येथे आगमन होणार आहे. तेथे ते नागरीकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता आंगणेवाडी येथे श्री भराडीदेवीचे दर्शन घेणार आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजापूर तालुक्यातील जवाहर चौकात शिवसैनिकांसमवेत संवाद साधतील. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास श्रीदेव धुतपापेश्वर मंदिर येथे दर्शन घेणार आहेत आणि मंदिर बांधकामाची पाहणी करणार आहेत. दुपारी दोन वाजता रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील शिवसेना कार्यालय येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता संगमेश्वर येथे सायंकाळी सहा वाजता चिपळूण येथे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in