"शिवसेना ही आमचीच! स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी..." विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आपल्या देशात लोकशाहीला मारलेले आहे आणि देशात हिटलरशाही सुरू झालेली आहे हे जगाला आता कळलेले आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
"शिवसेना ही आमचीच! स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी..." विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

"शिवसेना ही आमचीच आहे. शिवसेना शिंदेंची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितले, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालावर भाष्य केले आहे. तसेच, आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार पात्र कसे काय? असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

"स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसे करावे याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला. शिवसेना कुणाची हे लहान मुलही सांगू शकते", असेही ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वोच्च असतात. नार्वेकरांना त्या ठिकाणी कशासाठी बसवण्यात आले ते आता समोर आले आहे. एक परिमान असते. पण, नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवले. त्यांच्या मागे महाशक्ती असल्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयाच्या वर असल्याचे दाखवून दिले. शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे. सर्वोच्च न्यायालयात ही लढाई सुरू आहे. नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केला, असेही त्यांनी सांगितले.

सध्याच्या सरकारने लोकशाही पायदळी तुडवली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अधिकार तरी बाधित राहतात का हे पाहावे. त्यासाठी सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पवारांचा ठाकरेंना सल्ला-

निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल असे अजिबात वाटत नव्हते. सत्ताधाऱ्यांनी निकाल काय लागणार याबाबत आधीच भाष्य केले होते. मुख्यमंत्र्यांनीही निकाल त्यांच्याच बाजूने लागेल असे म्हटले होते. त्यांना खात्री होती तसाच निकाल लागला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच, निकाल वाचल्यावर आणि वकिलांशी चर्चा केल्यावर याबाबतची अधिक स्पष्टता येईल. हा निकाल पाहिल्यावर उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल, असा सल्ला त्यांनी दिला आहे. कोर्टात ही केस सोयीची होईल. त्यांना तिथे न्याय मिळेल अशी खात्री या निकालाच्या निर्णयावरून दिसते, असेही पवार म्हणाले.

लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही-

राहुल नार्वेकर अनेक वर्षे आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? लोकशाहीची एवढी निर्लज्ज हत्या मी कधी पाहिली नाही. लोकशाहीमध्ये खोके सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे, पण जास्त अपेक्षा जनतेकडून आहे. आम्ही सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत, असे असताना अशा प्रकारचा निर्णय येतो हे धक्कादायक आहे. आपल्या देशात लोकशाहीला मारलेले आहे आणि देशात हिटलरशाही सुरू झालेली आहे हे जगाला आता कळलेले आहे”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

हा निर्णय नाही, हे षडयंत्र - राऊत

आजचा निकाल हा कोणताही निर्णय नाही, हे षडयंत्र आहे. ज्या व्यक्तीने हा निर्णय दिला त्या व्यक्तीने देखील उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसलाय. ज्या शिवसनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली, ती शिवसनेचा कोणाची हा निर्णय भाजपची व्यक्ती घेणार का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

त्यांची औकात काय राऊत?

कोण एकनाथ शिंदे, कोण भरत गोगावले, त्यांची लायकी काय? विधानसभा अध्यक्षच बेकायदेशीर आहेत. घटना कोणाची वैध हे ठरवणारे विधानसभा अध्यक्ष कोण? असेही राऊत यांनी यावेळी म्हटले.

राज्यात मागील दीड वर्षांपासून सुरू असलेल्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदे यांच्यासह 16 आमदार पात्र ठरवल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, मूळ पक्षही शिंदेंचाच असून भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप हा वैध आहे, असा निर्णय नार्वेकरांनी दिला. दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे आमदार देखील पात्र ठरवले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in