उद्धव ठाकरेंचे ‘लक्ष्य मुंबई’; विधानसभेसाठी मुंबईतील २५ जागांची चाचपणी

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश, पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर मतदारराजाने दाखवलेला विश्वास यामुळे ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
उद्धव ठाकरेंचे ‘लक्ष्य मुंबई’; विधानसभेसाठी मुंबईतील २५ जागांची चाचपणी
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश, पक्षफुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर मतदारराजाने दाखवलेला विश्वास यामुळे ठाकरे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागांपैकी कुणाला किती जागा याबाबत महाविकास आघाडीचे नेते निर्णय घेणार आहेत. मात्र, मुंबईतील ३६ जागांपैकी २५ जागांवर लढण्याची तयारी ठाकरे गटाने केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने १६ ते १८ जागांवर उमेदवार उभे करण्याबाबत हालचाल सुरू केल्याने मविआत नेमके काय सुरू हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या शिवसेनेची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. पक्षफुटीनंतर ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेले यश यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेना नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याबाबत हालचाल सुरू असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईवर ‘फोकस’ केला असून ३६ पैकी २५ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे, असे शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून सांगण्यात आले.

शिवसेना आणि मुंबईचे नाते अतूट आहे. आजही मुंबईत बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. मुंबई म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. ज्या मुंबईतून शिवसेना राज्यभरात पोहोचली, तीच मुंबई जिंकण्यासाठी ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसत आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतसुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचे समजते.

वरिष्ठ पातळीवर निर्णय

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असून महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in