

सोलापूर : पावसाने सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे उजनी धरण झपाट्याने भरत असून सध्या धरणाची पाणीसाठा ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. धरणात अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने प्रशासनाने भीमा नदीत ७० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने महाराष्ट्रभर हजेरी लावली असून अनेक भागातला धरणसाठा वाढला आहे.
सध्या दौंड परिसरातून उजनी धरणात जवळपास ७० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या ३६ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल १५ टक्क्यांनी वाढ झाली असून पुढील २४ तासांत उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, वीर धरणातून सोडण्यात आलेले २५ हजार क्युसेक पाणी पंढरपुरात पोहोचले आहे.
भीमा नदी ओसंडून वाहू लागली
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. उजनी धरण १०० टक्के भरत असताना भीमा नदी ओसंडून वाहू लागली असून आता शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे तसेच शेतीपंपांसाठी वीजपुरवठा आठ तास करण्याच्या मागणीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. उजनी धरणातील वाढता पाणीसाठा आणि भीमा नदीतील विसर्गामुळे एकीकडे प्रशासन सतर्क झाले असले, तरी दुसरीकडे खरीप हंगामासाठी पाण्याची चिंता मिटणार आहे. त्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.