उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

"अशी कोणती घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला, याचेही सत्य आपल्याला काढावे लागले. मी यासंदर्भात..."
उल्हासनगर गोळीबार प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणी वरिष्ठ स्थरावर चौकशी करण्यात येणार असून डीजींना याबाबतचे आदेश दिले असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"कल्याणची घटना गंभीरच आहे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल. अशी कोणती घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला, याचेही सत्य आपल्याला काढावे लागले. मी यासंदर्भात वरिष्ठ स्तरावरुन चौकशीचे आदेश डीजींना दिले आहेत. यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई केली जाईल", असे फडणवीस म्हणाले.

काय आहे प्रकरण?

जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्यातून भाजप कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला. यानंतर गणपत गायकवाड यांनी आपल्या कृत्याची कबुलीही दिली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

केलेल्या कृत्याचा पश्चाताप नाही-

पोलीस स्टेशनच्या दरवाजामध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली. या लोकांनी माझ्या जागेवर जबरदस्तीने कब्जा केला होता. या सर्व गोष्टीचा मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मला केलेल्या कृत्याचा काही पश्चाताप नाही, असे गणपत गायकवाड गोळीबारानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप-

गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचे काम करत आहेत. ते मुख्यमंत्री असले तर राज्यात केवळ गुन्हेगारच पैदा होतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवले आहे, असे गायकवाड म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केली रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस-

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in