
नवनीत बऱ्हाटे/उल्हासनगर
त्यांनी शेवटचा श्वास घेतल्याचे जाहीर झाले... मृत्यू प्रमाणपत्रही मिळाले… अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली… आणि तेवढ्यात शरीर हलले! छातीत धडधड होती! डोळे हळूहळू उघडत होते..! उल्हासनगरातील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ‘मृत’ घोषित करण्यात आलेल्या ६५ वर्षीय अभिमान तायडे हे प्रत्यक्षात जिवंत होते आणि वेळेत दुसऱ्या रुग्णालयात नेल्याने त्यांना पुन्हा जीवनदान मिळाले.
६५ वर्षीय अभिमान तायडे या आजारी व्यक्तीला डॉक्टरांनी केवळ वरवरच्या तपासणीतून मृत घोषित करून थेट मृत्यू प्रमाणपत्र दिले. पण काही वेळातच, जेव्हा त्यांच्या छातीत धडधड जाणवली आणि डोळे हलू लागले, तेव्हा सारे हादरून गेले. अभिमान तायडे यांची प्रकृती काही दिवसांपासून बिघडलेली होती आणि त्यांच्यावर मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. घरी असताना अचानक ते बेशुद्ध झाल्याने त्यांच्या मुलगा सचिन तायडेने त्यांना तातडीने शिवनेरी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे उपस्थित असलेल्या डॉ. प्रभु आहुजा यांनी रिक्षामधूनच वरवर तपासणी करून त्यांना 'मृत' घोषित केले आणि शिवनेरी रुग्णालयाने तात्काळ मृत्यू प्रमाणपत्रही दिले. रुग्णालयातून घरी नेताच त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. मात्र, घरच्या एका सदस्याच्या लक्षात आले की तायडे यांच्या छातीत हालचाल सुरू आहे. झपाट्याने त्यांना उल्हासनगरमधील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. प्रकाश कौरानी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच काही वेळात अभिमान तायडे शुद्धीवर आले.
हलगर्जीपणावर सवाल
मात्र केवळ 'गोंगाट' किंवा 'नस न मिळणे' ही कारणे वैद्यकीय शिस्तीला धरून आहेत का? असा सवाल आता समाजमाध्यमांपासून ते वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत उपस्थित होऊ लागला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय प्रक्रियेतील बेजबाबदारी, प्राथमिक तपासणीतील गंभीर त्रुटी, आणि रुग्णाच्या जीवाशी खेळ करण्यातील हलगर्जीपणावर सवाल निर्माण झाले आहेत
या प्रकरणात रुग्णाची नस सापडली नसल्याने मोठी चूक झाली. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्याने आजूबाजूला गोंगाट होता, त्यामुळे तायडे यांच्या हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत. तसेच हे मानवी चुकांमधील एक आहे आणि याबाबत आम्ही खेद व्यक्त करतो. - डॉ. प्रभु आहुजा