शासकीय भाड्याच्या जागेत उभारले अनधिकृत पंचतारांकित हॉटेल; पुण्यातील विशाल अगरवालचे महाबळेश्वर कनेक्शन उघड

पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणामध्ये पोर्शे गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना येत्या ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शासकीय भाड्याच्या जागेत उभारले अनधिकृत पंचतारांकित हॉटेल; पुण्यातील विशाल अगरवालचे महाबळेश्वर कनेक्शन उघड

- रामभाऊ जगताप

कराड: पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अँड रन' प्रकरणामध्ये पोर्शे गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी 'त्या' अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने या दोघांना येत्या ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले असतानाच या प्रकरणातील विशाल अगरवाल याचा आणखी एक कारनामा उघड झाला असून सातारा जिल्ह्यातील त्याचे 'महाबळेश्वर कनेक्शन' असल्याची माहितीही समोर आली आहे तर यामध्ये विशाल अगरवालने महाबळेश्वर येथील शासकीय भाड्याच्या जागेत अनधिकृत पंचतारांकीत हॉटेल उभारले असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळच अगरवालसारखे बडी बडी धेंडे पैशाच्या जोरावर शासकीय यंत्रणांना खिशात घालत व कायदा गुंडाळत काय काय 'धंदे' करतायत हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरवरमधील एका मोक्याच्या ठिकाणावरील शासकीय जागेवरती डल्ला मारत सदर जागाच भाडेतत्वावर आपल्या खिशात घालून त्याठिकाणी विशाल अगरवाल याने पंचतारांकित हॉटेल सुरू केले आहे.सदर केवळ हॉटेलचं नाही तर तेथे परमिट रुम व बिअर बार,लिकरसह पबहीचीही 'सोय' असल्याने या विरोधात महाबळेश्वर पालिकेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इतकेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या प्रकरणी तक्रार देण्यात आली आहे.मात्र मुख्यमंत्र्यांच्या गावातील लोकांच्या तक्रारींकडे प्रशासन कसे सोयीस्कर दूर करते हेही यानिमित्ताने पुढे आले आहे.

महाबळेश्वर येथे पारशी जिमखाना नावाचे क्लब व ट्रस्ट होता. या ट्रस्टच्या मालकीची असलेल्या या मिळकतीत अगरवालचे सदर पंचतारांकित हॉटेल आहे. सन २०२० साली विशाल अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही मिळकत त्याच्या नावावर केली. ट्रस्टची ही जागा त्याच्या नावावर कशी झाली ? ट्रस्टने क्लबला परवानगी दिली होती का ? आदी प्रश्नही अनुत्तरीतच असतानाच या ठिकाणी आता पंचतारांकित हॉटेल व रिसॉर्ट सुरु करण्यात आले असून ते अग्रवाल याने दुसऱ्याला भाडेतत्वावर चालविण्यासाठी दिलेले आहे. याबाबत महाबळेश्वर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ एप्रिल २०२४ रोजी पत्र देत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. मात्र हवालदार यांच्या मागणीलाच जिल्हाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने अगरवालचे 'हात' किती वरपर्यंत पोहचले असले आहेत हेही यातून दिसून येत आहे.

महाबळेश्वर येथील हॉटेल एम.पी.जी क्लबच्या मालकी हक्कावरुन उद्योगपती विशाल सुरेंद्र अगरवाल यांच्याविरुद्ध सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवालदार यांनी केली.

महाबळेश्वर तापोळा मुख्य रस्त्यावरील शासकीय मिळकतीमध्ये रहिवासा करीता देण्यात आलेली पारसी जिमखाना नावाने असलेली मिळकत एमपीजी क्लब या नावाने व्यावसायिक वापर अग्रवाल हे करत असल्याचा आरोप हवालदार यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पारसी जिमखाना या नावाने असलेली मिळकत ट्रस्टला रहिवासी करीता कराराने भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती अशी माहिती हवालदार यांना मिळत आहे. पारसी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या ट्रस्टींची नावे २०२० साली कमी करून सध्या अगरवाल कुटुंबियांची नावे ट्रस्टी म्हणून असल्याची माहिती पुढे आली आहे. हे रिसॉर्ट सध्या रिजंटा या कंपनीला व्यवसाय चालविण्यासाठी देण्यात आले आहे. हे रिसॉर्ट सुरु झाल्यापासूनच अनेक कारणांमुळे चर्चेत होते. या ठिकाणी स्पा व बार देखील सुरु आहे. गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये अनेकांनी महाबळेश्वर नगरपालिकेकडे एम.पी.जी क्लबबाबत विविध तक्रारी अर्ज दिले होते. हे रिसॉर्ट अगरवाल यांचे असून या रिसॉर्टबाबत नगरपालिकेकडे आलेल्या सर्वच तक्रारींची आपण गांभीर्याने दखल घेणार असल्याचे महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांनी बुधवारी सायंकाळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in