कराड : पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवालला सातारा जिल्हा प्रशासनाने शनिवारी सकाळी मोठा दणका दिला. अगरवालच्या महाबळेश्वर येथील बेकायदेशीर एमपीजी क्लबचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. उद्योगपती विशाल अगरवाल याचे महाबळेश्वर येथील बेकायदेशीर हॉटेल काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने सील केले होते. शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. सकाळीच साडेदहापर्यंत प्रशासनाने हॉटेलच्या अवैध १५ खोल्यांचे बांधकाम पाडून तोडकामाची कारवाई पूर्ण केली.
मुख्यमंत्र्यांनी दिले होते कारवाईचे आदेश
बिल्डर अगरवालच्या हॉटेलमध्ये अनियमितता असल्यास कारवाईचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाने केलेल्या तपासणीत हॉटेलच्या बारमध्ये अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
भाडेपट्ट्यावरील जागेचा वाणिज्यिक वापर
लीजवरील एमपीजी क्लबच्या जागेचा वाणिज्यिक कारणासाठी वापर होत असल्याचे आढळल्यानंतर प्रशासनाला जाग आली. या क्लबला काही दिवसांपूर्वी प्रशासनाने टाळे ठोकले होते.