देशात नीतिशून्य पक्षाची सत्ता! उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

नीतिशून्य, विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे. याची मला लाज वाटते आहे. त्यामुळे यापुढे असे होता कामा नये,
देशात नीतिशून्य पक्षाची सत्ता! उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

अलिबाग : नीतिशून्य, विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे. याची मला लाज वाटते आहे. त्यामुळे यापुढे असे होता कामा नये, असे आवाहन शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ते अलिबाग तालुक्यातील चौल येथे जनसंवाद मेळाव्यात बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या दोन दिवसीय जनसंवाद दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी पेण, अलिबाग आणि रोहा तालुक्यात जनसंवाद मेळावे घेतले. भगव्याला लागलेला कलंक पुसण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार अनंत गीते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे उपस्थित होते.

ते म्हणाले की, ‘तोडा फोडा आणि झोडा’ ही भाजपची नीती आहे. जातीपातीत भांडणे लावायची, समाजात तेढ निर्माण करायची, हिंदू, मुस्लीम दंगे निर्माण करायचे आणि आपल्या राजकीय पोळ्या शेकायच्या, हा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे लोकांना सतर्क करणे गरजेचे आहे. भाजप ही भेकड आणि बेडूक जनता पार्टी आहे. या पक्षातून त्या पक्षात जाणारे, कर्तृत्व नसलेले सर्वजण या पक्षात सहभागी झाले आहेत. भाजपमध्ये ना नेते जन्माला आले ना आदर्श. त्यामुळे इतर पक्षांतील नेते आणि आदर्श चोरायचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची अट भाजपने त्यावेळी मान्य केली असती तर आज जो चोरबाजार मांडला आहे तो मांडायची वेळ आली नसती. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. निवडणुकीनंतर त्यांच्यावर अडीच वर्ष विरोधी पक्षनेते होण्याची वेळ आली. घरफोडीनंतर ते मुख्यमंत्री होतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांना अर्धे उपमुख्यमंत्रीपद दिले गेले. आता ते पाव उपमुख्यमंत्री झाले असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in