कोल्हापूर : विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केंद्र शासनाकडून ग्रामीण तसेच शहरी भागात केले जात आहे. शासकीय योजनांचे लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी जिल्हयात विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत गावोगावी योजना देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून केंद्रीय सहसचिव कार्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार अनीता शाह अकेल्ला यांची नियुक्ती झाली आहे, त्यांनी शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथे सुरू असलेल्या संकल्प यात्रेला १५ जानेवारी रोजी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रसिद्धी रथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांना २०२४ च्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. अनिता शाह यांनी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
कृषी विभागांतर्गत औषध फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक ड्रोनचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, गट विकास अधिकारी सोनाली मडकर, नायब तहसीलदार गणेश लव्हे, सरपंच भगतसिंग चौगुले यांच्यासह गावातील लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेबाबत उपस्थितांना माहिती दिली. ते म्हणाले, बांबवडे गावत संकल्प यात्रेला मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना राबवीत असताना काहींना लवकर लाभ मिळतो तर काहींना उशिरा; यासाठीच प्रसिद्धीसह उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी ही यात्रा आपल्या गावत आली आहे. शासन आता आपल्या दारात योजना घेऊन येत आहे हा आजच्या काळातील प्रमुख बदल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात घेण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांचा लाभ जिल्ह्यातील १०० टक्के लक्षित लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, अशा सूचना विकसित भारत संकल्प यात्रेच्या केंद्रीय सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारी अधिकारी अनिता शाह अकेला यांनी दिल्या.