विकास ठाकरे देणार गडकरींना टक्कर; गडकरींचा प्रचार आधीपासूनच सुरू

नितीन गडकरींची विकास पुरुष म्हणून निर्माण झालेली प्रतिमा हे होतेच. गडकरींनी ज्या काही धडाक्याने देशभरात विकास कामे केली त्यामुळे त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. मतदारसंघात देखील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
विकास ठाकरे देणार गडकरींना टक्कर;  गडकरींचा प्रचार आधीपासूनच सुरू

- अविनाश पाठक

नागपूर लोकसभा मतदारसंघ हा यंदाही संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे एक हेवीवेट नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. यावेळी रिंगणात २६ उमेदवार उतरले असले तरी खरी लढत ही नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यातच होणार हे स्पष्ट दिसते आहे. नाही म्हणायला वंचित बहुजन आघाडीचे योगेश लांजेवार हे रिंगणात आहेत. मात्र ते फारशी कोणाची मतेही खातील असे तरी चित्र दिसत नाही.

यावेळीही नितीन गडकरी रिंगणात उतरणार हे नक्की होते. तरीही भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राची नावे नव्हती. त्यामुळे त्यांचेही नाव आले नाही. त्यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे, संजय राऊत, आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी चांगलाच गोंधळ केला होता. त्यांच्या मते हा महाराष्ट्रावर अन्याय झाला होता. या तिघांनीही गडकरींच्या कार्यक्षमतेचे चांगलेच कौतुक केले होते. नंतर दुसऱ्या यादीत गडकरींचे नाव जाहीर झाले आणि या मंडळींचा गोंधळ थांबला.

गडकरींच्या विरोधात कोणी लढायचे हा यावेळी सर्वांसमोर प्रश्न होता. याला प्रमुख कारण गडकरींची विकास पुरुष म्हणून निर्माण झालेली प्रतिमा हे होतेच. गडकरींनी ज्या काही धडाक्याने देशभरात विकास कामे केली त्यामुळे त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. मतदारसंघात देखील त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पक्षभेद बाजूला ठेवून मदत करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले काम विशेष दखलपात्र ठरले होते. परिणामी काँग्रेसकडून कोणी उभे राहायचे यावर सुरुवातीला चांगलाच खल झाला. शेवटी काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गळ्यात ती जबाबदारी टाकली गेली.

विकास ठाकरे यांच्यासमोर गडकरींसारखे हेवीवेट उमेदवार असल्याने आव्हान तगडे आहे. मात्र काँग्रेसमधल्या सर्व गटांना ते एकत्र आणून कामाला लावू शकले शकले तर ते गडकरींना चांगली लढत देऊ शकतील यात शंका नाही. त्यांचाही प्रचार छोट्या छोट्या सभांच्या माध्यमातूनच सुरू आहे.

नागपूरचे महापौरही होते विकास ठाकरे

विकास ठाकरे हे साधारणतः २००० पासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून पुढे आलेले विकास ठाकरे पहिल्याच टर्म मध्ये नागपूरचे महापौर झाले. त्यांची महापौरपदाची कारकीर्दही चांगलीच गाजली. नंतर काही काळ ते विरोधी पक्षनेते देखील होते. २०१९ मध्ये ते पश्चिम नागपूर मतदार संघातून भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार सुधाकर देशमुख यांना पराभूत करून आमदार म्हणून निवडून गेले होते. आमदार म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगली राहिली आहे. विशेष म्हणजे आजही त्यांची प्रतिमा एक स्वच्छ आमदार म्हणूनच राहिली आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांपासून ते नागपूर शहराचे काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरात त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या सर्व गटांनी त्यांचे नाव पुढे केले आहे.

चुरशीची लढत अपेक्षित

यावेळी नागपूर लोकसभा क्षेत्रात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे अशी सरळ लढत होणार आहे. यात दोन्ही उमेदवारांच्या स्वच्छ प्रतिमा या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. नितीन गडकरी हे १९७७ पासून नागपूरच्या राजकारणात सक्रिय राहिले आहेत. आज सर्व पक्षांमध्ये त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून भाजपचेही कट्टर कार्यकर्ते आहेत. असे असले तरी आज मुस्लीम दलित ख्रिस्ती अशा सर्व समाजांमध्ये त्यांचे प्रेमाचे संबंध आहेत. विकास ठाकरे यांचे देखील शहरात चांगले संबंध असून सर्वांशी चांगला संपर्क राहिला आहे. त्यामुळे विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी ही लढत रंगणार यात शंका नाही. यात गडकरींच्या विजयाची जरी खात्री सर्वजण देत असले तरी विकास ठाकरे हे निश्चित चांगली लढत देतील असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

...आणि विकास ठाकरे यांनाच केले उमेदवार

आधी विकास ठाकरे माध्यमांना बाईट देताना सांगत होते की आमच्याकडे गडकरींच्या विरोधात लढायला २० पेक्षा अधिक लोक तयार आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणीच तयार होत नव्हते. शेवटी सर्वांनी मिळून विकास ठाकरे यांना घोड्यावर बसवले आणि विकास ठाकरेंनीही आपला अर्ज दाखल केला आहे.

गडकरींच्या प्रचाराला आधीच सुरुवात

गडकरींचे नाव बरेच आधी नक्की झाले होते. त्यामुळे त्यांचा प्रचार देखील सुरू झाला होता. आजही संपूर्ण शहरात त्यांच्या प्रचार रॅली पूर्ण झालेल्या आहेत. ठिकठिकाणी छोट्या छोट्या बैठकींच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी मुलगा निखिल आणि दोन्ही सुना देखील अशा छोट्या छोट्या बैठकींमध्ये जाऊन जनसामान्यांना भेटत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in