देशभरातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्यानेच आम्ही मोदींसोबत; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा खुलासा

महायुतीच्या विदर्भ प्रचारदौऱ्यात नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मीदेखील शिर्डीतून निवडणूक लढवून लोकसभेत जावे अशी माझी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती.
देशभरातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्यानेच आम्ही मोदींसोबत; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा खुलासा

नागपूर : लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागा वाटपात आम्हाला काही जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी ती पूर्ण झाली नाही. तरीही या निवडणुकीत आपण मोदीजींसोबतच असावे, अशी देशभरातील कार्यकर्त्यांची इच्छा असल्यानेच आम्ही महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला, असे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले.

महायुतीच्या विदर्भ प्रचारदौऱ्यात नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मीदेखील शिर्डीतून निवडणूक लढवून लोकसभेत जावे अशी माझी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी आमचा नाईलाज असल्याचे सांगत विधानसभेत तुम्हाला निश्चित योग्य ते स्थान देऊ असे आश्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर नव्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाचा देखील प्रयत्न करण्याचेही आश्वासन दिले असल्याचे आठवलेंनी सांगितले. मोदींना पाठिंबा देण्यामागे त्यांनी गेल्या दहा वर्षात देशात केलेला विकास कारणीभूत आहे,  असेही आठवले म्हणाले.

जुन्या कायद्यांमध्ये कालानुरूप सुधारणा

संविधान बदलत असल्याचा निरर्थक आरोप वारंवार करून या देशातील दलित आणि मागासवर्गाला राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी फसवत आहेत त्यांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये. काही नवे कायदे करणे किंवा काही जुन्या कायद्यांमध्ये कालानुरूप सुधारणा करणे म्हणजे संविधान बदलणे असा अर्थ घेता येत नाही असेही त्यांनी ठणकावले.

दलित समाजाचा काँग्रेसने अपमानच केला

पूर्वी काही काळ आमच्या पक्षाने काँग्रेस सोबत काम केले होते. मात्र या पक्षाने दलित समाजाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा कायम अपमानच केला असा आरोप आठवले यांनी केला. राहुल गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेसला काहीही भवितव्य नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत का राहायचे असा सवाल त्यांनी केला.

मोदी सरकार घटना बदलणार नसल्याची ग्वाही

संविधान बदलले जाईल असा वारंवार आरोप करणारे विरोधक बदलतील मात्र मोदी सरकार संविधान बदलणार नाही याची आपण ग्वाही देऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ४५ प्लस ...

आम्ही पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या प्रचारात उतरलो असून महाराष्ट्रात ४५ प्लस जागा जिंकण्यात आमचाही सहभाग असेल असा दावा त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in