
पुणे : देवगड अल्फोन्सो (हापूस) आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी ‘हापूस (अल्फोन्सो)’ च्या भौगोलिक संकेत (जीआय) टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर असलेल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ स्टिकर लावणे बंधनकारक असेल आणि असे यूआयडी असलेले आंबेच ‘देवगड हापूस’ किंवा ‘देवगड अल्फोन्सो’ म्हणून विक्री किंवा विपणन करता येणार आहे.
या उपक्रमामुळे देवगड हापूसच्या नावाखाली सर्रास होणारी बनावट आंब्यांची विक्री पूर्णतः बंद होतील आणि ग्राहकांना केवळ जीआय प्रमाणित, अस्सल देवगड हापूस आंबेच मिळतील, असा संस्थेचा विश्वास आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादितचे संचालक सदस्य ॲड. ओंकार एम. सप्रे म्हणाले, देवगड तालुक्यातील हापूस आंबा गेल्या शतकाहून अधिक काळ आपल्या विशिष्ट सुगंध व चवीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला बाजारात मोठी मागणी आहे.
सध्या देवगड हापूसच्या नावाखाली विक्री होणारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त आंबे हे वास्तविक देवगडमधील नाहीत. गेल्या तीन दशकांपासून इतर भागांतील निकृष्ट दर्जाचे आंबे सर्रास देवगड हापूस म्हणून विकले जात आहेत. त्यामुळे देवगडमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, त्याचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम देखील होत आहेत. त्यामुळेच ‘हापूस (अल्फोन्सो)’ च्या जीआय टॅगची रजिस्टर्ड प्रोप्रायटर या नात्याने प्राप्त होणाऱ्या अधिकारांचा वापर करून संस्थेने ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ सक्तीचे करण्याचा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.”
या प्रकल्पाकरिता ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ चे पेटंट असलेल्या संस्थेने मुंबई स्थित सन सोल्यूशन्स संस्थेबरोबर करार केला आहे.देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ वितरित केले आहेत. शेतकऱ्यांनी बाजारात पाठवलेल्या प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर हा यूआयडी स्टिकर लावणे बंधनकारक असेल.जीआय नोंदणी नसलेले आणि ‘टँपर प्रूफ यूआयडी सील’ स्टिकर नसलेले कोणीही ‘देवगड हापूस’ च्या नावाने विक्री करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील संस्थेने दिला आहे.