

गिरीश चित्रे / मुंबई
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून मतदार यादीतील घोळ, दुबार मतदार, निवडणूक प्रक्रियेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदान-मतमोजणी, निवडणूक प्रक्रियेची कशाप्रकारे अंमलबजावणी करणार याविषयी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याबरोबर दैनिक 'नवशक्ति'ने केलेली खास बातचीत -
निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाची काय तयारी आहे?
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व योग्यरीत्या पार पडावी यासाठी १ लाख ९६ हजार ६०५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत १० हजारांहून अधिक मतदान केंद्र असून पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी काय उपाययोजना आहेत?
आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर फ्लाईग स्काॅड, चेक पोस्ट, व्हिडीओ शूटिंग, भरारी पथके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी संध्याकाळी होणारा गोंधळ कसा टाळणार?
राज्यात २९ महानगरपालिकांमध्ये मतदानादिवशी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत मुंबईत १,२०० मतदान केंद्र होते. परंतु मुंबईत ती संख्या कमी करत ८०० ते ९०० मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. एका मतदान केंद्रावर ९०० मतदार मतदान करू शकतील. यात ७०५ खासगी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहेत.
अनेक ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे...
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसह काही अन्य पक्षांचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अधिनियमात बिनविरोध निवडून येण्याची तरतूद आहे. त्यावर निवडणूक आयोग आक्षेप घेऊ शकत नाही. तरीही याप्रकरणी उमेदवारांना आमिष दाखवले का, दबाव आणला का, याची तपासणी करण्यात येणार असून १५ जानेवारीपर्यंत अहवाल प्राप्त होईल. १६ जानेवारी मतमोजणीच्या दिवशी बिनविरोध उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
नार्वेकर प्रकरणात काय झाले?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारांना धमकावले याबाबत एकदोन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाला असून त्यात व्हिडीओत राहुल नार्वेकर धमकावत असल्याचे निष्पन्न झाले नाही. तरीही राज्य मुख्य निवडणूक अधिकारी इक्बालसिंह चहल यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
मतदारांना काय आवाहन कराल?
महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्राॅनिक्स मीडियामधून जाहिरात देत जनजागृती करण्यात येणार आहे. सिनेमागृहांत मध्यांतरी जाहिरात दाखवण्यात येणार आहे. मतदान हा १८ वर्षांवरील प्रत्येकाचा अधिकार असून १५ जानेवारी रोजी मतदान करा, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगामार्फत करण्यात येत आहे.