महापालिका निवडणुकीत बिनविरोधांचा धडाका; महायुती-भाजपचा वरचष्मा, विरोधकांना धक्का

सत्ताधारी महायुती व भाजपने समन्वय, शिष्टाई आणि राजकीय ताकदीच्या जोरावर अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली आहे.
महापालिका निवडणुकीत बिनविरोधांचा धडाका; महायुती-भाजपचा वरचष्मा, विरोधकांना धक्का
Published on

महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या टप्प्यानंतर ठाणे, भिवंडी, पनवेलसह विविध महानगरपालिकांमध्ये बिनविरोध निवडींचा जोर वाढताना दिसत आहे. सत्ताधारी महायुती व भाजपने समन्वय, शिष्टाई आणि राजकीय ताकदीच्या जोरावर अनेक प्रभागांमध्ये बिनविरोध विजय मिळवत आघाडी घेतली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांतील बंडखोरी, अपक्ष उमेदवारी आणि संघटनात्मक कमकुवतपणाचा फटका बसत अनेक ठिकाणी विरोधकांना मोठा राजकीय धक्का सहन करावा लागला आहे.

शिंदे सेनेचे सात उमेदवार विजयी

ठाणे : उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सहा महिला व एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर १ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे ८९१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच २ जानेवारी रोजी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने वागळे इस्टेट आणि वर्तकनगर भागातील शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले.

हे सर्व उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील आहेत. काही इतर प्रभागांमध्येही बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्या ठिकाणी शिंदे सेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही.

प्रभाग क्रमांक १८ मधून जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे हे तिघे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या प्रभागातील पॅनलमधील उमेदवार निलेश लोहाटे यांचा अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यात यश आले नाही. त्यामुळे या प्रभागातील दीपक वेतकर यांची निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

दरम्यान, सावरकरनगर येथील प्रभाग क्रमांक १४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या अरुणा पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर मनसेच्या रेश्मा चौधरी यांचा अर्ज बाद झाला. परिणामी शिंदे सेनेच्या श[तल ढमाले या बिनविरोध निवडून आल्या.

याशिवाय किसननगर येथील प्रभाग क्रमांक १७ मधून एकता भोईर, तर वर्तकनगर येथील प्रभाग क्रमांक ५ मधून जयश्री डेव्हिड आणि सुलेखा चव्हाण या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत.

कल्याण-डोंबिवलीत महायुतीची रणनीती यशस्वी, २० उमेदवार बिनविरोध

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत महायुतीने जोरदार रणनीती राबवत तब्बल २० उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवले आहे. गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या सातत्यपूर्ण राजकीय हालचालींमुळे हा निकाल शक्य झाला.

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याची चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेत एकूण २० नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, त्यामध्ये भाजपचे १४, तर शिंदे गटाच्या शिवसेनेचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार (१४) - आसावरी नवरे - प्रभाग क्र. २६ (क), रंजना पेणकर - प्रभाग क्र. २६ (ब), रेखा चौधरी - प्रभाग क्र. १८ (अ), मंदा पाटील - प्रभाग क्र. २७ (अ), विशु पेडणेकर - प्रभाग क्र. २६ (अ), साई शेलार - प्रभाग क्र. १९ (क), महेश पाटील - प्रभाग क्र. २७ (ड), दीपेश म्हात्रे - प्रभाग क्र. २३ (अ), हर्षदा भोईर - प्रभाग क्र. २३ (ड), डॉ. सुनिता पाटील - प्रभाग क्र. ३० (अ), ज्योती पाटील - प्रभाग क्र. २४ (ब) हे विजयी झाले, तर शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली पश्चिम पॅनल क्र. २४ विश्वनाथ राणे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, वृषाली जोशी डोंबिवली पूर्व पॅनल क्र. २८ (अ) हर्षल मोरे, कल्याण पूर्व पॅनल क्र. ११ (अ) रेश्मा किरण निचळ, डोंबिवली प्रभाग क्र. २८ (ब) ज्योती राजन मराठे या बिनविरोध निवडींमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे.

भिवंडीत भाजपची दमदार आघाडी, सहा उमेदवार बिनविरोध विजयी

भिवंडी : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच सहा नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची नोंद झाली असून, विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे भिवंडीत भाजपची विजयी घोडदौड सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. या सहा उमेदवारांमध्ये एका अल्पसंख्यक मुस्लिम उमेदवाराचाही समावेश आहे.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी पद्मानगर येथील प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपचे उमेदवार सुमित पुरुषोत्तम पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सुमित पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे आहेत. यानंतर शुक्रवारी, अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यात आमदार महेश चौघुले यांच्या सक्रिय शिष्टाईमुळे आणखी पाच उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला. प्रभाग क्रमांक १८ अ मधून अश्विनी सन्नी फुटाणकर, १८ ब मधून दीपा दीपक मढवी, १८ क मधून अबूसूद अशफाक अहमद शेख, प्रभाग क्रमांक १६ अ मधून परेश (राजू) चौघुले तसेच प्रभाग क्रमांक २३ ब मधून भारती हनुमान चौधरी हे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

या यशावर प्रतिक्रिया देताना आमदार महेश चौघुले यांनी सांगितले की, हा विजय भाजपने राबवलेल्या विकासात्मक कामांचा आणि विश्वासार्ह नेतृत्वाचा परिणाम आहे. त्यामुळेच मुस्लिमबहुल प्रभाग क्रमांक १८ मधून तीन उमेदवार बिनविरोध निवडून आणणे शक्य झाले, असे त्यांनी नमूद केले.

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा षटकार

पनवेल : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिका निवडणूक प्रमुख आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या बिनविरोध विजयामुळे पनवेलमध्ये भाजप महायुतीने विजयाचा ‘षटकार’ मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या विजयाचा पहिला मान प्रभाग क्रमांक १८ मधील नितीन जयराम पाटील यांनी मिळवला. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाच विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आणखी पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये प्रभाग क्रमांक १८ मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग क्रमांक १९ मधून दर्शना भगवान भोईर आणि रुचिता गुरुनाथ लोंढे, तर प्रभाग क्रमांक २० मधून अजय तुकाराम बहिरा व प्रियांका तेजस कांडपिळे यांचा समावेश आहे.

या सर्व विजयी उमेदवारांचा निवडणूक प्रभारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, विधान परिषदेचे सदस्य अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, गणेश कडू, राजेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या माजी तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘एकच वादा, प्रशांतदादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. पनवेलच्या विकासासाठी नागरिकांनी भाजप महायुतीवर दाखवलेला विश्वास अधिक जबाबदारीने पेलून पनवेल शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार यावेळी महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in