असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

असंघटित कामगारांना अत्यंत कमी पैशात आणि हक्काचे घर मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते .
असंघटित कामगारांच्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

सोलापूर : विडी कामगारांसाठीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या १० हजार घरांचे गोदूताई परुळेकर वसाहतीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि जेष्ठ कामगार नेते तसेच या गृहप्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम मास्तर यांच्या स्वप्नातील दुसरा ३५० एकरावरील देशातील पहिलाच असंघटित कामगारांसाठीचा गृहप्रकल्प अर्थात "रे नगर" चा पथदर्शी प्रकल्प तयार झाला आहे. सर्व घरांची मालकी महिलांकडे असणाऱ्या या ३० हजार असंघटित कामगारांच्या घरांपैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे वाटप शुक्रवार १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेतून साकारण्यात आलेल्या या साडेपाच लाख रुपये किंमत असलेल्या गृहप्रकल्पाला २४ तास सर्व मूलभूत सुविधा दिल्या आहेत. सोलापूर शहरापासून ११ किलोमीटरवर कुंभारी गावच्या परिसरात सुमारे ३५० एकरावर नवीन शहरच वसले आहे.

कुंभारी परिसरात असंघटित कामगारांसाठी जगातील सर्वात मोठा " रे नगर " चा हा गृहप्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे १८०० कोटींचा राज्य आणि केंद्र सरकारचा निधी असलेल्या या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१९ साली पंतप्रधानांनीच केले होते. ३० हजार घरांचे आणि ८५४ इमारतींचे हे अत्यंत सुंदर शहर कुंभारी परिसरात वसले आहे.

या प्रकल्पामध्ये अंगणवाडीसह शाळा तसेच जवळपास ७ पाण्याच्या टाक्या यासह विजेचे स्वतंत्र उपकेंद्र आहे. तसेच २४ तास सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. असंघटित कामगारांना हे ३०० चौरस फुटाचे " वनबीएचके" घर मिळणार असून, यामध्ये आता हे सर्व असंघटित कामगार ताबा घेतल्यानंतर वास्तव्यास येणार आहेत.

महिलांकडे घरांची मालकी असलेला गृहप्रकल्प

असंघटित कामगारांना अत्यंत कमी पैशात आणि हक्काचे घर मिळावे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू होते . त्या प्रयत्नाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमधून ३० हजार पैकी १५ हजार घरे पूर्ण झाली आहेत. आपली आता "स्वप्नपूर्ती" झाली असून, त्याचा मनोमन आनंद वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महिलांकडे मालकी असलेल्या या घरांच्या चाव्या प्रदान करण्याचा सोहळा पार पडत आहे.

logo
marathi.freepressjournal.in