ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

उन्हाळ्याच्या झळांनी सर्वसामान्य नागरिक त्रासलेले असतानाच ठाणे, डोंबिवली, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर कायम आहे. या पावसामुळे आंबा, काजूसह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे.
ठाणे, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच

मुंबई : उन्हाळ्याच्या झळांनी सर्वसामान्य नागरिक त्रासलेले असतानाच ठाणे, डोंबिवली, कोकण, मराठवाड्यात अवकाळीचा कहर कायम आहे. या पावसामुळे आंबा, काजूसह अन्य पिकांना मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ठाणे, डोंबिवलीत संध्याकाळी आलेल्या पावसाने कामावरून घरी चाललेल्या चाकरमान्यांची त्रेधातिरपीट उडाली.

देशासह राज्यात उन्हाचा कडाका जाणवत आहे. तापमान ४० च्या आसपास गेले आहे. घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. त्यातच अवकाळी पावसाचे थैमान राज्याच्या विविध भागात सुरू आहे. कोकणात चिपळूण, खेडला मुसळधार पाऊस पडत आहे. मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने खेड भरणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. खेडसह चिपळूणमधील ग्रामीण भागात चक्रीवादळ झाल्याने आंबे गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गंगापूर तालुक्यात जोरदार वादळासह पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा जोर जास्त असल्यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. उतरणीसाठी आलेला आंबा मोठ्या प्रमाणावर वादळामुळे गळत आहे. त्याचबरोबर मका, बाजरी, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, शिरवळ परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे महाबळेश्वरच्या गजबजणाऱ्या बाजारपेठांत शुकशुकाट जाणवला. अनेक ठिकाणी पर्यटकांनी मात्र पावसाचा आनंद घेतला.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. जोरदार आलेल्या पावसाने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. मात्र, वादळी पावसाने शेतातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले.

रायगडच्या माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात गारांचा पाऊस कोसळला. जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. खामगाव, शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. महाड, माणगाव, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, कर्जत, खोपोली, खालापूर तालुक्यातही अवकाळी पाऊस कोसळला. यामुळे या परिसरातील वीटभट्टी व्यावसायिक संकटात सापडले आहेत. विटांच्या थरांचा ढीग जाळण्यासाठी रचण्यात आला होता. मात्र, अवकाळीने या व्यावसायिकांवर मोठं संकट निर्माण केले आहे.

लातूर शहर आणि परिसरात दुपारी तीन वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजांच्या गडगडाटात पाऊस झाला. अर्धा तासापेक्षा अधिक काळ पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. जिल्ह्यातील किल्लारी, औसा आणि निलंगा तालुक्यातील अनेक भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी कोसळल्या.

logo
marathi.freepressjournal.in