पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

अरबी समुद्राच्या आग्नेय भागाकडे सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळताना दिसत आहे.
पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज
Published on

पुणे : राज्यात ऐन हिवाळ्यात पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत पुढील तीन दिवस हवामान ढगाळ राहील. दरम्यान, राज्यात किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. शनिवारी राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रायगडमध्ये रविवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबारमध्येही तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूरमध्येही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्राच्या आग्नेय भागाकडे सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आता निवळताना दिसत आहे. तर, लक्षद्वीपच्या किनारपट्टी भागावर वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंत आता नव्याने कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होताना दिसत आहे. कर्नाटकातील या कमी दाबाच्या पट्ट्याचे परिणाम उत्तर प्रदेशापर्यंत दिसत असून महाराष्ट्रावर असणारे पावसाचे सावट याच हवामान स्थितीचे परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ हवामान

मुंबईत पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे.

logo
marathi.freepressjournal.in