पुन्हा अवकाळीचा धुमाकूळ ; मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, सातारा, मेढा, जावळी तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली
File Photo
File PhotoANI

हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत शुक्रवारी राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या आंबा, काजू आणि द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट दिला असून मुंबई आणि पुण्यातही पुढील ४८ तासांत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवेतील विसंगतीमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशपासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यभरात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. शुक्रवारी उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे पावसाने हवेत काहीसा गारवा निर्माण झाला. आजरा तालुक्यातील हत्तीवडे येथे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी मजूर महिला जखमी झाली. पाऊस आणि वाऱ्यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही गळून पडला आहे.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, सातारा, मेढा, जावळी तालुक्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात गारपीट झाली. जवळपास अर्धा तास अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. वर्धा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अकोला जिल्ह्यात पावसामुळे पातूर आणि बाळापुरात मोठे नुकसान झाले. गारपिटीने संत्रा, भाजीपाला, गहू आणि हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पातूर तालूक्यातील बेलूरा गावातील नाल्याला पूर आला. अकोला बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला हरभरा आणि गहू पावसामुळे भिजला.

तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसह जांभुळ पिकाला फटका बसला आहे. बेळगाव जिल्ह्यात वीजांचा गडगडाट होऊन पावसाला प्रारंभ झाला. अचानक सुरू झालेल्या पावसाने खरेदीसाठी बाजारात आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर बसून विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना देखील आपले साहित्य सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी आसरा शोधावा लागला.

पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा, पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या ८ एप्रिलला विदर्भात वीजांच्या गडगडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in