
गेल्या काही दिवसांपासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. यामुळे काही जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिके जमीनदोस्त झाली. आता मंगळवारी आणि बुधवारी काही शहरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर येत्या ४ दिवसात राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. तसेच, काही भागामध्ये गारपिटदेखील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली, जालना तसेच पुणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईतही अनके भागांत पावसाची रिमझिम पहायला मिळाली. तसेच ठाणे जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे रब्बीची पिके धोक्यात आली असून गहू, हरभरासह आंबा, द्राक्ष आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले.