सिंधुदुर्ग : कोकण, विदर्भात अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अनारी गावात जोरदार पाऊस कोसळला. अनारीच्या डोंगरात गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस पडला. गावात एका तासात ११० मिमी पाऊस पडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पावसामुळे अनारी गावात पूल बांधकामाचे साहित्य पावसात वाहून गेले आहे. गावातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत.
मुंबईत जोरदार पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात येत्या २४ तासांत जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात उकाडा प्रचंड वाढला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी व मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
३२ गावांना झोडपले
सावर्डे, वहाळ, डेरवण, कोंडमळा, कामथे, असुर्डे परिसर, नायशी, दहिवली आदी जवळपास ३० ते ३२ गावांना वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने अशरक्ष: झोडपून काढले. या परिसराचा आणि सावर्डेचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. वीजेचे खांब आणि तारा कोसळल्या आहेत. यामुळे या सर्व भागात अंधाराचे साम्राज्य पसरले असून असह्य उकाड्याने जनता हैराण झाली आहे. सावर्डे परिसरात नेहमीसारखे वातावरण होते. अचानक अंधार दाटला आणि साधारणपणे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच बाजारपेठेत मोठ्या संख्येने आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. सावर्डे हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील बाजारपेठेत आसपासच्या गावातून जनता खरेदीसाठी येत असते. पाऊस सुरू होताच या लोकांनी घर गाठण्यासाठी प्रयत्न सुरू केले.पावसाचा जोर अचानक वाढत गेला. त्यात मेघगर्जनाही सुरू झाल्या. विजांचा लखलखाट सुरू झाला आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सोसाट्याच्या वार्यामुळे अनेकठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे.
या सोसाट्याच्या वार्यासह आलेल्या पावसाने सावर्डे ते डेरवण हॉस्पिटल रोडवरील अनेकठिकाणी झाडे कोसळली. वीजेचे खांब कलंडले. विद्युतवाहिन्या तुटल्याने बत्ती गुल झाली. यामुळे आधीच असह्य उष्मा जाणवत असताना वीजपुरवठा बंद झाल्याने जनता अधिकच त्रस्त झाली आहे.
काहींच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने ऐन पावसाळ्यात संसार उघडा पडला आहे. सावर्डे येथे वीज कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे. त्याचेदेखील नुकसान झाले आहे. शिवाय या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी वीजेचे खांब कोसळले असून वीदजवाहिन्या तुटल्या आहेत.तुटलेल्या फांद्यांमुळे वाहतूक खंडीत झाली आहे. अनेक गावांचा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करणे हे आव्हान त्या-त्या गावातील गावकर्यांनी स्विकारले आणि स्वत:च रस्त्यावर पडलेली झाडे आणि फांद्या दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठमोठाले वृक्ष कोसळल्याने ते दूर करणे त्यांना सहजासहजी शक्य नसल्याने जोपर्यंत प्रशासनाकडून कटींग मशीन किंवा अन्य यंत्रणा पोहोचत नाहीत तोपर्यंत रस्त्यावर कोसळलेली झाडे दूर करणे हे तसे अवघड काम होते. मात्र तरीही गावकरी आपल्या परीने प्रयत्न करत होते.
सावर्डे वहाळफाटा येथे दुकान गाळ्यांवर झाड पडले असून पाच दुकानदारांचे नुकसान झाले आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे. संपूर्ण सर्व्हिस रोडवर चिखलाचे साम्राज्य तसेच पाणी भरले आहे. सावर्डे कुडपफाटा येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या शेडवरील पत्रे उडून बाजूला असणार्या दुर्गवाडी रोडवर पडले. तसेच बाजूला असणार्या साईव्हीला अपार्टमेंटवरदेखील पडले. यामुळे सावर्डे परिसरात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. डेरवण फाट्यावरील महावितरणची 11 के.व्ही. लाईनवरील पोल वादळाने कोसळल्याने सावर्डे पंचक्रोशीतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे या परिसरातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. डेरवण काजरकोंड गावात ठिकठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत.तर उभ्या असलेल्या गाड्यांवर झाडे कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले आहेत. तर काही दुकानांचे पत्रा शेड उडाली आहे. या संपुर्ण 30 ते 32 गावांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला असून किमान 2 दिवस तो सुरळीत करण्यासाठी लागतील, असा महावितरणचा अंदाज आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ही सर्व गावे अंधारात बुडाली आहेत. खुद्द सावर्डेमध्येदेखील अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. महावितरण आणि संबंधित खात्याचे अधिकारी, कर्मचारी आपल्यापरिने वाहतूक आणि वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करताना दिसत होते